हॉटेल जगदंबमध्ये सिलेंडरचा स्फोट (फोटो- istockphoto)
दौंड–पाटस मार्गावरील हॉटेल जगदंबामध्ये एलपीजी सिलेंडरचा स्फोट
१० कर्मचारी भाजले, ६ जणांची प्रकृती गंभीर
अष्टविनायक मार्गावरील मांढरे मळा परिसरात घडली घटना
दौंड: दौंड–पाटस अष्टविनायक मार्गावरील मांढरे मळा परिसरात असलेल्या हॉटेल जगदंबामध्ये मंगळवारी दुपारी भटारखान्यातील घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत हॉटेलमध्ये काम करणारे एकूण दहा कर्मचारी भाजले असून, त्यापैकी सहा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
दौंड शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या हॉटेलमध्ये स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की हॉटेलचे पत्रे उडून गेले, तसेच दर्शनी भागातील काचेच्या खिडक्या तावदानासह खाली कोसळल्या. स्फोटात भाजलेल्या कर्मचाऱ्यांना मांढरे मळा येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ दौंड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी गंभीररित्या भाजलेल्या सहा कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोल्हापूरच्या गारगोटी-कडगाव रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा थरार; आगीत कार जळून खाक
घटनेची माहिती मिळताच दौंड नगरपालिका तसेच कुरकुंभ एमआयडीसी अग्निशामक दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणत हॉटेलमधून एकूण २१ एलपीजी सिलेंडर सुरक्षितरित्या बाहेर काढले. यामध्ये १४ घरगुती वापराचे तर ७ वाणिज्य वापराचे सिलेंडर असल्याची माहिती देण्यात आली. मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा असतानाही वेळेवर कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, दौंड पोलिस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. आगीत भाजलेल्या दहा जणांपैकी सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
भीषण आगीमुळे कोल्हापूर हादरले
कोल्हापूर शहरातील शाहूनगर परिसरातील एका घराला मंगळवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Fire News: भीषण आगीमुळे कोल्हापूर हादरले! सिलेंडरचा स्फोट झाला अन्…
आग लागल्यानंतर काही वेळातच घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीने अधिक भयानक रूप धारण केले. आगीचे लोळ संपूर्ण घरभर पसरले. सिलिंडर स्फोटामुळे आगीची तीव्रता वाढल्याने घरातील फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य व इतर वस्तू जळून खाक झाल्या. काही क्षणातच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. दरम्यान, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून, शॉर्टसर्किट, गॅसगळती किंवा अन्य कारणांमुळे आग लागली का, याचा शोध घेतला जात आहे.






