सौजन्य : iStock
गोंदिया : पांढऱ्या पावडरने काळपट झालेले दागिने साफ करून देतो असे सांगून आलेल्या दोन अनोळखी भामट्यांनी महिलेचे 1 लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सालेकसा तालुक्यातील रोंढा येथे घडली.
हेदेखील वाचा : वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट; कोमकर-गायकवाडमधील महत्वाची दुवा सापडला
सालेकसा तालुक्यातील रॉढा येथील रजवंता विष्णुदास लिल्हारे (51) ही महिला गुरुवारी सकाळी आपल्या घरी होती. दरम्यान सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी दोन अनोळखी व्यक्ती आले. आम्ही कंपनीकडून आलो आहोत. कंपनीने एक पावडर विकसित केला असून त्याने दागिने स्वच्छ होतात, असे सांगितले.
तसेच तुम्हाला विश्वास नसेल तर आम्ही तुमच्या समोरच दागिने स्वच्छ करून देतो असेही ते म्हणाले. त्याच्यावर विश्वास ठेवून रजवंता लिल्हारे यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचा वापरता सोन्याचा मंगळसूत्र आणि 21 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस असा एकूण 1 लाख 65 हजार रुपये किमतीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी दिले.
दागिने स्वच्छ करून त्यांनी एका कापडात बांधून ठेवल्याचा बनाव केला. त्यानंतर ते निघून गेले. ते अनोळखी व्यक्ती गेल्यानंतर महिलेने दागिने बघितले असता ते दिसून आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रजवंता लिल्हारे यांनी सालेकसा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
हेदेखील वाचा : क्रूरतेचा कळस! तिला विवस्त्र करुन डोळे अन् तोंड बांधून अल्पवयीन दिव्यांग मुलीवर केला लैंगिक अत्याचार, नराधम अटकेत






