सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/ अक्षय फाटक : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात ‘कोमकर’ कुटूंबाचा सहभाग समोर आला असून, पोलिसांनी टोळीप्रमुख सोमा उर्फ सोमनाथ गायकवाड आणि कोमकर यांच्यामधील महत्वाची भूमिका बजावणाऱ्या एका गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दरम्यान, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय ३३, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भेल्हेकरला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंधरा दिवसांपुर्वी (१ सप्टेंबर) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून खून केला गेला. या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २२ जणांना पकडले आहे. त्यात वनराज आंदेकर यांची बहिण संजीवनी, तिचा पती जयंत व इतर कोमकर कुटूंबितील अशा चौघांना अटक केली आहे. खूनानंतर वनराज यांचे वडिल सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांनी प्रमुख आरोपींमध्ये नाव दिले होते.
परंतु, सोमा गायकवाडच्या टोळीने टोळी युद्धातून तसेच अनिकेत आखाडे याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी खून केल्याचे सांगितले जात होते. तशी कबूली देखील आरोपी देत होते. मात्र, कोमकर कुटूंबाचा सहभाग नाही, असे बोलले जात होते. परंतु, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात कुटूंबाचे पहिल्यापासून या खून प्रकरणात सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोमकरवर आरोपींच्या जामीनाची जिम्मेदारी
गणेश कोमकर तसेच, सोमा गायकवाड, अनिकेत दुधभाते व प्रसाद बेल्हेकर यांची गेल्या काही महिन्यांमध्ये चार वेळा भेटी झाल्या आहेत. या भेटीत खूनासंदंर्भात बोलणी झाली असून, कटात चौघेही प्रमुख भूमिकेत आहेत. गणेश कोमकर याच्यावर वनराज याचा खून करणाऱ्या आरोपींच्या जामीनाची जिम्मेदारी दिली होती. ती कोमकरने घेतली देखील होती. लागेल तो पैसा व इतर खर्च तो देणार होता.
तीन अल्पवयीनामधील एक सज्ञान
आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी २२ आरोपी पकडले. त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. मात्र, त्यातील एक आरोपी हा सज्ञान असल्याचे समोर आले आहे. त्याने पोलिसांचा मार खाण्यासाठी मी अल्पवयीन असल्याचे सांगितले होते. आता पोलिसांनी या अल्पवयीन म्हणून घेणाऱ्या श्री तात्यासाहेब गायकवाड (वय १८) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.