
Gondiya News: गोंदियात दोन दुर्घटना, दोन बळी; तलावात मुलाचा तर मूर्ती विसर्जनावेळी जवानाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
मासे पकडण्याचा मोह जीवावर बेतला
मोरगाव अर्जुनी तालुक्यातील निलज येथे गावाजवळ असलेल्या कानाबोडी तलाव परिसरात काही मुले खेळण्यासाठी गेली होती. यावेळी जयेंद्र भुमेंद्र चौधरी हा नऊ वर्षीय मुलगाही मित्रांसोबत तलावाजवळ गेला होता. दरम्यान, त्याचे काही मित्र तलावात मासे पकडत होते. त्यांना पाहून जयेंद्रलाही मासे पकडण्याचा मोह झाला. तो तलावात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो खोल पाण्यात बुडाला. जयेंद्रसोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करत मदतीसाठी गावकऱ्यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र जयेंद्रला वाचवण्यात यश आले नाही. शोधादरम्यान त्याचा मृतदेह आढळून आला.
मूर्ती विसर्जनावेळी जवानाचा मृत्यू
दुसरीकडे, तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथे श्रीकृष्ण मूर्ती विसर्जनादरम्यान भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कार्तिक गौतम असे ३४ वर्षीय मृत जवानाचे नाव आहे. कार्तिक गौतम हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच ते सुट्टीसाठी आपल्या मूळ गावी बेरडीपार येथे आले होते. गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्यानंतरच्या उत्सवाचा उत्साह सुरू असताना ते मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. विसर्जनादरम्यान पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत त्यांचा बुडून मृत्यू झाला. सुट्टीसाठी गावी आलेल्या जवानाचा अचानक मृत्यू झाल्याने गौतम कुटुंबीयांसह संपूर्ण बेरडीपार गावावर शोककळा पसरली आहे. गोंदिया जिल्ह्यातील या दोन घटनांमुळे जलस्रोत आणि विसर्जनस्थळी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न घेता तलाव, नदी किंवा अन्य जलस्रोतांमध्ये उतरणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनांनी अधोरेखित केले आहे.