फोटो सौजन्य- ChatGPT
ऐरोलीत थरावरून पडून गोविंदाचा मृत्यू
नवी मुंबईतील ऐरोली येथील साईनाथवाडी परिसरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानवी मनोरा रचताना घणसोली येथील ३४ वर्षीय स्वप्निल नावाच्या गोविंदाचा तोल गेला. तो खाली पडल्याने गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर आयोजकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, रबाळे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई
मालाडमध्ये खांब कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
दुसरीकडे, मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील चिकुवाडी येथे स्थानिक मुलांनी दहीहंडीचा उत्सव आयोजित केला होता. यावेळी हंडी फोडण्यासाठी दोर एका झाडाला आणि इमारतीच्या तळमजल्यावरील खांबाला बांधण्यात आला होता. हंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हा खांब अचानक कोसळला. यावेळी सात वर्षीय रुद्र कदम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दहीहंडीदरम्यान १६८ गोविंदा जखमी
मुंबईतील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना झालेल्या दुर्घटनांमध्ये शनिवारी रात्रीपर्यंत १६८ गोविंदा जखमी झाल्याची नोंद सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये झाली. यापैकी २९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर ८१ जणांवर उपचार सुरू होते. उपचारानंतर ५८ गोविंदांना घरी सोडण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, सेंट्रल रिजनमधील रुग्णालयांत १०६, ईस्टर्न सबर्ब्समध्ये २९ आणि वेस्टर्न सबर्ब्समध्ये ३३ जखमी गोविंदांची नोंद झाली.
केईएम रुग्णालयात सर्वाधिक ३३ जखमी गोविंदांची नोंद झाली. याशिवाय राजावाडी रुग्णालयात २०, नायरमध्ये १७, पोतदारमध्ये १६, हिंदुजा येथे १४, बीडीबीए रुग्णालयात १३ आणि सायन रुग्णालयात आठ जखमी गोविंदांवर उपचार करण्यात आले. दरवर्षी दहीहंडीच्या उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना गोविंदांना दुखापत होण्याच्या घटना घडतात. यंदाही उत्साह आणि थरार कायम असताना दोन जीव गमावल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






