crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
वसई: वसईमधून एक अशी चोरीची घटना समोर येत आहे जी एखाद्या चित्रपटालाही लाजवेल. एका उच्चशिक्षित तरुणीने आपल्याच बहिणीच्या सासरच्या घरी दीड कोटी रुपयांचे दागिने लंपास केले. मात्र वसई- विरार पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे ही उच्चशिक्षित महिला चोर अवघ्या १२ तासात पकडली गेली आहे. आरोपीचे नाव ज्योती भानुशाली (27 वर्ष) असून, ती उच्चशिक्षित असून बँकेत नोकरी करते.
चोरी का केली?
शेअर बाजारातील लाखोंचे नुकसान झाल्यामुळे ज्योती भानुशालीने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले आहे. तिने थेट आपल्या बहिणीच्या श्रीमंत सासऱ्याच्या घरी चोरी केली. घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने कुठे ठेवले आहेत हे तिला आधीच माहिती होते. त्यामुळे तिने संपूर्ण घटनेचा व्यवस्थित कट रचला.
फिलिमी स्टाईल चोरी
ही घटना रविवारी सकाळी घडली. रक्षाबंधनानिमित्त सगळे कुटुंबीय बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा तिने घेतला. ज्योतीने पुरुषाचा वेष धारण केला आणि शास्त्री नगरातील ओधवजी भानुशाली यांच्या घरी प्रवेश केला. सुरुवातीला भाड्याने फ्लॅट मिळेल अशी विचारणा केली. त्यानंतर पाणी पिण्यासाठी मागितले आणि मग “बाथरूमची भिंत गळत आहे” असे सांगून ओधवजी भानुशाली यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवले. यानंतर क्षणाचाही विलंब न करता तिने घरातून दीड कोटी रुपयांचे दागिने असलेल्या दोन बॅगा लंपास केल्या आणि पसार झाली. रात्री मुलगा आणि सून घरी परतले तेव्हा वृद्ध भानुशाली यांची सुटका झाली आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ माणिकपूर पोलिसांत दरोड्याची तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच, पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासतांना पोलिसांना चोरीचा माल घेऊन जाणारी एक महिला दिसली. तिचा चेहरा स्कार्फने झाकलेला होता, पण पोलिसांना तो स्कार्फ ओळखून आला. तो स्कार्फ भानुशाली यांच्या सुनेच्या बहिणीचा होता. पोलिसांनी पुढील तपास करत काही तासातच नवसारी येथून ज्योती भानुशालीला अटक केली. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ज्योतीला पकडले आणि तिच्याकडून चोरीचा माल जप्त केला.
वृद्ध आजोबांसमोर चोरट्याने घरातील दीड कोटींचा माल केला लंपास
सर्वात आधी चोरांनी वृद्ध उधोजी भानुशाली यांना त्यांच्या कच्छी बोली भाषेत बोलण्यात गुंतवले. आजोबांना याचं परिसरात भाड्याने घर पाहिजे असे सांगून आजोबांना बोलण्यात गुंतवले. आधी पिण्यासाठी पाणी मागितले आणि नंतर वॉशरूममध्ये जायचं आहे असं सांगून वॉशरूमला गेला.पण लगेचच ओरडत बाहेर येऊन तुमचे टॉयलेट लिकेज आहे. आजोबा देखील घाईगडबडीत नेमकं काय झाले ते बघण्यासाठी बाथरूममध्ये गेले. त्याचवेळी चोरट्याने त्यांना मागून धक्का दिला आणि टॉयलेटमध्ये बंद करून बाहेरून कडी लावून घेतली. त्यांनतर चोरट्यांनी संपूर्ण घरातील रोक रक्कम, दागदागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू लंपास केल्या. चोरी गेलेली एकूण रक्कम सुमारे 1 कोटी 50 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.ही घटना भरदिवसा घडल्यामुळे स्थानिक रहिवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.