अवघ्या 1230 रुपयांच्या बिलासाठी हॉटेलचालकाला तिघांची बेदम मारहाण; एकाने तर हातातील कड्याने...
छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये प्यायलेल्या दारूचे बिल मागितल्याने तिघांनी हॉटेलमधील वेटरसह हॉटेल चालकाला शिवीगाळ करुन लोखंडी कड्याने बेदम मारहाण केली. ही घटना शिवशंकर कॉलनी परिसरात घडली. अजय यशवंते, मुकेश जाधव (दोघे रा. पंचशिल नगर) आणि रवी सातदिवे (रा. रमानगर) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात हॉटेल चालक भरत राजेश्वर रेड्डी (वय ३१, रा. सौजन्य नगर, काल्डा कार्नर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी यांनी सायली हॉटेल हे कराराने घेतले असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या हॉटेलवर चालतो. ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अजय यशवंते, मुकेश जाधव आणि रवी सातदिवे असे तिघे सायली हॉटेलमध्ये येऊन बिअर पित बसले होते. काही वेळानंतर वेटर गणेश राठोड यांनी १२३० रुपयांचे बिल त्यांच्या टेबलवर दिले असता, त्यांनी बिल देण्यास नकार देत शिवीगाळ केली.
हेदेखील वाचा : रेक्टरकडून विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण; कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी शाळेतील धक्कादायक घटना
त्यानंतर तिघे काउंटरजवळ आले आणि हॉटेलचालक भरत रेड्डी यांच्याशी वाद घालू लागले. अजय यशवंते फ्रीजमधून आणखी एक बिअर बॉटल काढण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने त्याला थांबवले. त्यावरून रवी सातदिवे आणि मुकेश जाधव यांनी रेड्डी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली तर अजय यशवंत याने हातातील लोखंडी कड्याने त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वर व डोक्यात वार करून जखमी केले. त्यानंतर हे तिघे आरोपी बिल न देता पसार झाले.
कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत राडा
जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील शामराव पाटील निवासी व अनिवासी शिक्षण संस्थेत वर्चस्व वादातून विद्यार्थांच्या दोन गटात हाणामारी झाली. शाळेच्या आवारात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या हाणामारीनंतर रेक्टर राहुल कोळी यांनी दहावीच्या विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी रेक्टरविरुद्ध पेठ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.