
थाटामाटात लग्न झालं, पण पती निघाला नपुंसक; पत्नीसोबत शारीरिक संबंध टाळताना देत होता कारणं, अखेर...
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात संभाजीनगरमध्ये भलताच प्रकार समोर आला. मुलाचे नपुंसकत्व माहिती असूनही ते लपवून ठेवत त्याचे लग्न लावून देत विवाहितेची फसवणूक करण्यात आली. तसेच नाशिक येथे फ्लॅट घेण्यासाठी 15 लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. हा प्रकार २० मे २०२५ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान खुटवड नगर (नाशिक) येथे घडला.
पती गणेश गायकवाड, सासू सुनंदा गायकवाड, दीर पंकज गायकवाड, जाऊ पूनम पंकज गायकवाड, नणंद योगिता अशोक शिंदे, संगिता आशिष माळी, अंजली मुकेश मंडलिक, नणंदेचा पती आशिष माळी, मुकेश मंडलिक, मावस सासरा संजय जेजूरकर, मामा गोरख जगताप, मावस भाऊ भगवान जेजूरकर अशी विवाहितेची फसवणूक करत तिचा छळ करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Dharashiv Crime : जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा पितळ उघड ; अधिकाऱ्यांच्या दारातच निकृष्ट रस्ते, लाखोंचा अपहार आला समोर
याप्रकरणात ३२ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी महिलेचा विवाह २० मे २०२५ रोजी गणेश गायकवाड याच्याशी झाला. विवाहानंतर मात्र पतीने नवस केला आहे असे सांगत शारीरिक संबंध टाळले. महिन्यानंतरही संबंध न झाल्याने तिने डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली असता पतीने मारहाण व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या मंडळींना ही बाब माहिती असूनही त्यांनी पीडितेला गप्प राहण्याचा सल्ला दिला.
फ्लॅट खरेदीसाठी लावला तगादा
पुढे सासरच्यांनी नाशिक येथे फ्लॅट खरेदीसाठी १५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. पैसे दिल्याशिवाय शारीरिक संबंध होणार नाहीत, असे सांगण्यात आले. या मागणीबाबत तिने माहेरच्यांना सांगितल्यावर पीडितेचा भाऊ गणेशला समजवण्यासाठी आला असता त्याला देखील त्याने मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले, तर पीडितेला उपाशीपोटी डांबून ठेवण्यात आले असल्याचा आरोप देखील तक्रारीत नमूद केला आहे.
मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचा आरोप
पीडितेने तिच्या पतीचे त्याच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. याबाबत तिने पतीला विचारणा केली असता २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री पीडितेला जबर मारहाण करून तिला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्यात आले व दुसऱ्या दिवशी घराबाहेर हाकलून देण्यात आल्याचे देखील पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सय्यद हे करीत आहेत.
नातेवाईकांच्या मध्यस्थीने दिले 5 लाख रुपये
दरम्यान, सासरच्यांनी महिलेचे सोन्याचे दागिने व शैक्षणिक कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेतली. नातेवाईकांच्या मध्यस्थीने 5 लाख रुपये देण्यात आले व पतीच्या वैद्यकीय उपचारांचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यानंतरही मारहाण, धमक्या व मानसिक छळ सुरूच राहिला. ६ सप्टेंबर २०२५ रोजी तिला जबर मारहाण करण्यात आली. माहेरी आल्यानंतरही सासरच्यांनी आई-वडिलांच्या घरी येऊन भांडण करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
हेदेखील वाचा : ड्रग्ज रॅकेटला जोरदार दणका; ग्रामीण भागातून चालणाऱ्या नेटवर्कवरही पोलिसांची करडी नजर