
तरुण कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू
कसा झाला अपघात?
या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव वेदांत सुनील मोरे (वय १९, रा. इंदोली) असे असून त्याचे वडील सुनील मोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत. वेदांत हा गेल्या दोन महिन्यांपासून कोरेगाव येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. मंगळवारी सुट्टी असल्याने तो वडिलांसह दुचाकीवरून घरी येत असताना इंदोली हद्दीत ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत वेदांत रस्त्यावर कोसळला व ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत झाला.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता दोन ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता. ट्रॅक्टर चालक मोबाईलवर बोलत मोठ्या आवाजात स्पीकर लावून वाहन चालवत असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक बसली. इंदोली परिसरातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या ऊस वाहतुकीत ओव्हरलोड, भरधाव वेग आणि निष्काळजीपणा यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
अपघातानंतर ग्रामस्थांनी तत्काळ उंब्रज पोलीस व जयवंत शुगर कारखाना व्यवस्थापनाला माहिती दिली. गंभीर जखमी असलेल्या वेदांतला तातडीने पुणे येथे हलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र, कारखाना प्रशासनाने तसे आश्वासन देऊनही वेदांतला पुणे येथे न हलवता कराड येथील कृष्णा रुग्णालयातच उपचार सुरू ठेवण्यात आले. योग्य वेळी पुणे येथे हलविले असते तर वेदांतचा जीव वाचू शकला असता, असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी आंदोलनादरम्यान वारंवार केला.
इंदोलीतील नागरिक आक्रमक
वेदांतचा गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी कळताच इंदोलीतील नागरिक आक्रमक झाले. सकाळी ११ वाजता इंदोली–चोरे रस्त्यावर जयवंत शुगर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली. सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडत, मृत युवकाच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची ठाम भूमिका घेतली. या आंदोलनात पै. नयन निकम, मधुकर रावते, बाबासो निकम, योगेश निकम, विजय निकम, सुरेश लोकरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.) यांनी घटनास्थळी येऊन चर्चा करावी, अशीही मागणी करण्यात आली.
पोलीस छावणीचे स्वरूप
दरम्यान, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलीस व ग्रामस्थांमध्ये काही वेळा शाब्दिक चकमक झाली; मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. या घटनेमुळे ऊस वाहतुकीतील बेफिकिरी, कारखाना प्रशासनाची जबाबदारी आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मृत युवकाच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मृतदेह रात्री उशिरापर्यंत रुग्णालयातच
अपघातात जखमी झालेल्या वेदांतवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने जाहीर केले. त्यानंतर ग्रामस्थांनी इंदोलीत आंदोलन सुरू केले. रुग्णालयात वेदांतचे वडील थांबून होते आंदोलनादरम्यान तोडगा निघत नाही तो पर्यंत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावात न आणण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याने उशिरापर्यंत वेतांतचा मृतदेह रुग्णालयात होता. सायंकाळी सहा वाजता इंदोली ग्रामपंचायतीच्या लेटल पॅडवर जयवंत शुगर कारखान्याला पोलीसांकरवी लेखी निवेदन देवून जो पर्यंत मदत जाहीर करत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे कळविण्यात आले.
सायंकाळी ५.३० नंतर पोलीस बळ वाढवले
घटनास्थळी ग्रामस्थ सुमारे आठ तासांहुन अधिक काळ बसून होते कारखाना व्यवस्थापन येण्यास तयार नव्हते तत्यामुळे तणाव वाढत होता. पोलीस उप अधिक्षक विजय पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आंदोलन स्थळी दाखल झाले. उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र भोरे यांनी वारंवार आंदोलक ग्रामस्थांशी संवाद साधला पंरतु मृत युवकाच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ग्रामस्थ मागे हटत नसल्याचे पाहून पोलीसांनी सायंकाळी ५.३० नंतर पोलीस बळ वाढवले. सायंकाळी उशीरापर्यंत अनेक पोलीस अधिकारी व फौजफाटा हातात काठ्या घेवून इंदोलीत दाखल झाले.