punishment (फोटो सौजन्य- pinterest)
पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. गृहपाठ न केल्यामुळे इयत्ता चौथीच्या काही विद्यार्थिनींना जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षिकेने अमानुष शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. त्यामुळे चार दिवसांपासून विद्यार्थिनी त्रस्त आहेत. ‘मी जोपर्यंत वर्गात बोलवत नाही, तोपर्यंत उठाबशा काढा’, अशी शिक्षा विद्यार्थिनींना दिली. त्यामुळे ३ विद्यार्थिनींच्या पायाला जास्त प्रमाणात सूज आली असून, चार दिवसांपासून त्यांना चालण्यास त्रास होत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
बुधवारी शाळेच्या वेळेत विद्यार्थिनींना शिक्षा देण्यात आली. जास्त प्रमाणात उठाबशा काढल्यामुळे संध्याकाळपर्यंत विद्यार्थिनींच्या पायांना जास्त प्रमाणात सूज येऊन रात्रभर त्यांना त्रास सहन करावा लागला. दुसऱ्या दिवशी मुलींना त्रास सहन होत नसल्यामुळे शिक्षकवृंदाने त्यांना दवाखान्यात नेले. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला.
आम्ही वीटभट्टीवर काम करून आमचा उदरनिर्वाह करतो. आम्हाला शिक्षण घेणे शक्य झाले नाही, त्यामुळे आमच्या मुलीला शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही मुलीला शासकीय यंत्रणेच्या जबाबदारीवर शाळेत ठेवले. मात्र शिक्षिकेकडून आमच्या मुलीला अमानुष शिक्षा देण्यात आली. या शिक्षिकेवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. -संदीप तल्हा, पालक
विद्यार्थिनींनी गृहपाठ केला नसल्यामुळे त्यांना शिक्षा देण्यात आल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयामार्फत एक समूह पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून योग्य चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. -सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी, डहाणू
पाच मिनिटे उशिरा पोहोचल्याने कठोर शिक्षा
असाच एक प्रकार १७ जानेवारी रोजी पालघरमधील टेंभोडे गावात घडला. १०वीत शिकणारी विद्यार्थिनी सकाळी पाच मिनिटे उशिरा शाळेत पोहोचली.म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला शिक्षा म्हणून ५० पुश-अप्स करण्यास सांगितले. शिक्षेनंतर, विद्यार्थिनीला पाय आणि मांड्यांमध्ये तीव्र वेदना आणि पोटात वेदना जाणवू लागल्या. नंतर तिला उलट्या होऊ लागल्या, ज्यामुळे तिच्या पालकांनी तिला उपचारासाठी पालघरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिने तिथे तीन दिवस उपचार घेतले. पालघरमधील भगिनी समाज विद्यालयातील ही घटना आहे. विशेषतः तिच्या दहावीच्या बोर्ड परीक्षा जवळ आल्याने तिच्या पालकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.