
गणरायाच्या मिरवणुकीत मृत्यूचा ट्रेलर
छत्रपती संभाजीनगर : गणरायाच्या आगमनाचा जल्लोष सुरू असतानाच पिंप्री राजा येथे सोमवारी रात्री अनियंत्रित ट्रेलर मिरवणुकीत घुसला. ब्रेक निकामी झाल्याने नियंत्रण सुटलेल्या ट्रेलरने आधी गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर पुढे जात दुचाकीस्वारालाही धडक दिली. या विचित्र आणि भीषण अपघातात ट्रेलरचालक रमेश लहुजी बनसोडे (वय ५१) आणि विठ्ठल रामभाऊ जाधव (वय ३८, दोघेही रा. पिंप्री राजा) यांचा मृत्यू झाला; सात जण जखमी झाले.
सोमवारी रात्री आठच्या सुमारास पिंप्री राजा गावातून गणेशमूर्ती घेऊन मिरवणूक निघाली होती. त्याचवेळी एक ट्रेलर (एमएच-२१-बीएच-७४१६) दहेगाव-करमाड मार्गाने करमाडकडे येत होता. गावाजवळील वळणावर अचानक ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलर चालकाचा ताबा सुटला. काही क्षणांतच ट्रेलर मिरवणुकीत घुसला आणि ट्रॅक्टरला धडकला. धडकेनंतरही ट्रेलर थांबला नाही. पुढे जात त्याने एका दुचाकीस्वाराला धडक दिली आणि दुचाकी समोरील चाकाखाली आली.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेने मिरवणुकीत एकच धावपळ उडाली. ढोल-ताशांचा आवाज थांबून घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली. ग्रामस्थांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलविले. गणेश सुरेश पवार, हर्षवर्धन गणेश पवार, वैभव सोमीनाथ भावले, नामदेव बनसोडे, विष्णू गणेश राजने, अमोल शिवलाल फतपुरे, प्रकाश चंद्रभान पाखरे अशी जखमींची नावे आहेत.
करमाड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, जमादार जयसिंग नागलोत यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
ब्रेक फेल की आणखी काही?
ट्रेलरचे ब्रेक नेमके का निकामी झाले, अपघातावेळी त्याचा वेग किती होता आणि दुर्घटनेला अन्य कोणते कारण कारणीभूत ठरले, याचा करमाड पोलिस तपास करत आहेत.
गणरायाच्या स्वागताआधीच गावावर शोककळा
गणेशमूर्तीच्या आगमनासाठी जमलेल्या गर्दीतच दोन जीव गेल्याने पिंप्री राजा गावातील उत्सवाचा आनंद क्षणात शोकात बदलला.
गोंदियात ट्रकच्या धडकेत ६ मजुरांचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, हाताला काम मिळेल, कुटुंबाला दोन घास सुखाचे मिळतील… या आशेने मध्य प्रदेशातील मजूर तेलंगणाच्या दिशेने निघाले. मात्र, त्यांचा हा प्रवास गोंदिया जिल्ह्यातील नागराजवळ काळाने झडप घातल्याने कायमचा थांबला. भरधाव ट्रकच्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले.