Kolhapur News : कुरुंदवाडमध्ये अवैध धंद्यांवर मोठी कारवाई; 38 माव्याच्या पुड्या, दीड किलो सुपारीसह मुद्देमाल जप्त
कुरुंदवाड : कुरुंदवाड शहरात सुरू असलेल्या अवैध मावा विक्री व मटका जुगार यावर कुरुंदवाड पोलिस ठाण्याने बुधवारी (दि.९) सकाळच्या सुमारास चार ठिकाणी धडक कारवाई केली. यामध्ये एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन पानटप्यांवर छापे टाकण्यात आले. प्लेयर्स पान शॉप (सिद्धार्थ चौक) येथून नयुम झाकीर तेरदाळे याच्याकडून माव्याच्या ४० पुड्या, सुमारे एक किलो सुपारी आणि १४०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बाणदार पान शॉप (ईगल चौक) येथून सलीम गनी बाणदार यांच्याकडून माव्याच्या ४२ पुड्या आणि ८४० रुपये जप्त करण्यात आले. राधे पान शॉप (माळभाग) येथून दत्तात्रय पुंडलिक सूर्यवंशी यांच्याकडून ३८ माव्याच्या पुड्या, दीड किलो सुपारी आणि १६६० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
कोणतेही लेबल, सुरक्षेचा इशारा किंवा वैधानिक माहिती नसताना मावा उत्पादने खुलेआम विक्रीस ठेवण्यात आली होती. यासंबंधी पोलिस कॉन्स्टेबल खाडे, ऐवळे आणि जडे यांनी सरकारी फिर्यादी दिल्यानंतर संबंधित कायद्याच्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, नदीवेस नाका परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार प्रकरणातही कारवाई करण्यात आली. अनिल दशरथ गोपने याच्याकडून २२०० रुपये आणि महादेव ऊर्फ पिंटू देवगुंडा कुडचे याच्याकडून २८०० रुपये रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
शहर नागरिक मंचाने उठवला आवाज
या अवैध धंद्यांविरोधात कुरुंदवाड शहर नागरिक मंचाने माध्यमांद्वारे सातत्याने आवाज उठवला होता. जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत कुरुंदवाड पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली असून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरातील आस्थापने रात्री साडेदहानंतर सुरू राहिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पुण्यातही वाढत आहेत अवैध धंदे
दुसरीकडे, जुगार अड्डे, मटका, अवैध दारू विक्री आणि ड्रग्सचा व्यापार यांसारख्या बेकायदा गोष्टींनी शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मुळे रुजवली आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेकदा नागरिकांना अवैध धंद्यांबाबत तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्याला जाणे शक्य होत नाही किंवा भीती वाटते. पोलीस ठाणे व गावांचे अंतर खूप आहे. त्यामुळेच ही समस्या लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे. व्हॉट्सऍप नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.