
बनावट धनादेश देऊन करायचा फसवणूक
नाशिक : व्यापाऱ्याकडून फ्रीज, एसी, वॉशिंग मशिन खरेदी करून फसवणुकीच्या उद्देशाने बनावट चेक अथवा बाऊन्स होईल, अशा खात्यातील चेक देऊन नाशिकसह अहिल्यानगरमधील शेकडो व्यापाऱ्यांची फसवणूक करणारा संशयित आरोपी सात ते आठ वर्षांच्या कालावधीनंतर पोलिसांच्या रेकॉर्डवर आला. इतके वर्षे चेक बाऊन्स प्रकरण असल्याने पोलिस सरळ कोर्टात जाण्याचा सल्ला देत होते. कायद्यातील या पळवटीचा संशयिताने इतका वर्षे खुबीने वापर केला. आता किमान पुढील गुन्ह्यांना तरी चाप बसेल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
अनिल रमेश कोपरे (वय ३७, रा. संचराज अपार्टमेंट, हिरावाडी, मूळ पाटाचारोड, पिंपळगाव बसवंत) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने १८ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईनाका येथील मॅन्सन व्हिल्स या दुकानातून चेक देऊन इलेक्ट्रिक दुचाकी स्वतःच्या नावावर खरेदी केली होती. व्यावसायिकाने चेक वटवण्याकरीता बँकेत टाकला असता तो बनावट असल्याचे पुढे आले.
याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकाला हा संशयित ओझर येथील पगार मळा येथे येणार असल्याचे कळले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
व्यापाऱ्यांची फसवणूक
आरोपी बसवंत पिंपळगाव येथीलच रहिवासी असून, त्याला चेक बाऊन्स प्रकरणातील पोलिसांची भूमिका आणि न्यायालयात न पोहचणारे छोटे व्यापारी अशी कडी हाती आली. तो नाशिक जिल्ह्यासह सीमेवरील छोट्या व्यापाऱ्यांना चेक देऊन त्यांच्याकडून ५० ते ७० हजार रूपयांपर्यंतची वस्तू खरेदी करायचा. चेक दिल्यानंतर ती वस्तू घरी सुद्धा घेऊन जायचा. फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्याच्या उशिराने लक्षात यायचे. यावेळी मात्र संशयिताला चांगलाच धडा शिकवला.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, पुणे शहरातील बाणेर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिल्डरकडून फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नरेश उमाकांत महाजन असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बाणेर पोलिसांनी बिल्डर जयंतीलाल ओसवाल आणि ऋषभ ओसवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime: धक्कादायक! बिल्डरच्या फसवणुकीच्या नैराश्यातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या; सातव्या मजल्यावरून मारली उडी