धक्कादायक ! नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक; दागिन्यांसह रोकडही लुटली
नागपूर : एक तासाच्या कामाचे 500 रुपये देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने महिलेसोबत बळजबरी केली. मुलापासून दडवून ठेवलेले दागिनेही घेऊन फरार झाला. या प्रकरणात आरोपीसंबधी कुठलाच ठाव ठिकाणा नसताना गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला शोधून काढले. रजनीशकुमार दुबे (वय ५०, रा. कळमना) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळचा रिवा (मध्यप्रदेश) येथील असून, गेल्या ५ वर्षांपासून नागपुरात राहतो. तो आचारीचे काम करतो.
पीडित महिला ५० वर्षांची असून, ती साफसफाई, धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करते. तिला एक मुलगा आहे. मुलगा दारूच्या आहारी गेला असून व्यसनासाठी तो घरातील साहित्यांची विक्री करतो. त्याच्या भीतीने पीडित महिला दागिनेही सोबत ठेवायची. घटनेच्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी ती कामावरून घरी जात असताना आरोपी रजनिश तिला रस्त्यात भेटला. मी महाराज आहे. भांडी धुण्याचे तासाभऱ्याचे काम आहे. यासाठी पाचशे रुपये देईन, असे आमिष दिले.
पीडिता त्याच्या आमिषाला बळी पडली. दुचाकीवर बसवून तिला प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीत निर्जन अपार्टमेंटमध्ये तो घेऊन गेला. तिथे पायऱ्यावरच तिच्याशी बळजबरी केली. तिच्या जवळील पर्स हिसकावून पसार झाला. पर्समध्ये सोनसाखळी आणि रोख साडेतीन हजार रुपये होते. पीडित महिला अस्ताव्यस्त अवस्थेत खाली आली. आरडाओरड केल्यानंतर लोकांची गर्दी झाली. लोकांच्या मदतीने प्रतापनगर ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
दोनशे आचाऱ्यांचे तपासले छायाचित्र
गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट १ आणि ४ सोबतच सोनसाखळी पथकही करत होते. पीडित महिलेने केवळ आरोपीचे वर्णन सांगितले. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील जवळपास दोनशे आचारींची तपासणी केली. त्यांचे छायाचित्र गोळा करून महिलेला ओळख पटविण्यास सांगितले. एका छायाचित्रावर महिला थांबली, तो फोटो रजनिशचा होता.
पोलिसांनी संपर्क साधला अन् आरोपी अटकेत
पोलिसांनी सर्व आचाऱ्यांशी संपर्क करून रजनिशला शोधून काढले. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त सहुल माकणिकर, सहायक पोलिस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात युनिट क्रमांक एक, चार आणि सोनसाखळी पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने केली.