बँकेत नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा; तब्बल 16 लाखांना फसवले, अवघ्या आठ महिन्यांत...
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहे. त्यातच क्रेडिट विभागात १०० टक्के नोकरी, हमखास २५ ते ३५ हजार पगार अशा आश्वासनांनी एका बनावट बँकिंग अकॅडमीने तब्बल २४ विद्यार्थ्यांना १५ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी ते २३ सप्टेंबर दरम्यान जवाहनगर परिसरातील चेतक घोडा चौकात घडला.
या प्रकरणात बनावट बँकिंग अकॅडमी चालविणाऱ्या सुदेश ऑबिनाथ पाटील (रा. चेतक घोडा, जवाहर नगर) याच्यासह मुंबईच्या कोटक बँकेचा मॅनेजर रुपेश पठारे व अहिल्यानगरात राहणारा वसंत बापट अशा तिघांविरोधात जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सौरव संजय नरवडे (वय २५, रा. मुळे कार्नर, जुनी मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये सोशल मीडियावर नॅशनल अकॅडमी ऑफ बँकिंग या नावाने जाहिरात आली होती.
त्यात 90 दिवसांचा ऑनलाईन कोर्स पूर्ण केल्यास बँकिंग क्षेत्रात क्रेडिट विभागात हमखास नोकरी मिळेल अशी हमी देण्यात आली होती. नरवडे यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता, तेथे सुदेश आंबिनाथ पाटील भेटला. त्याने स्वतःला अकॅडमीचा मालक म्हणून सांगत असे.
फी भरून कोर्स
कोर्ससाठी ३५ हजार फी सांगण्यात आली होती. प्रथम दोन हप्त्यांत १५ हजार रुपये फोन पे द्वारे घेतले. कोर्स पूर्ण झाल्यानंतर ‘तुझी कोटक महिंद्रा बँकेत असिस्टंट क्रेडिट मॅनेजर म्हणून निवड झाली’, असे सांगत उर्वरित ५५ हजार रुपये उकळले. अशा प्रकारे नरवडे याच्याकडून एकूण ७० हजार रुपये आरोपीने उकळले. पुढील १५ दिवसात तुझे बँकेतर्फे व्हेरिफिकेशन होईल व त्यांनतर १० दिवसांनी दिवसांनी बँकेकडून मेल आल्यावर तुला बँकेत नोकरी जॉईन करावी लागेल, अशी थाप मारली.
बनावट व्हेरिफिकेशन; प्रकार आला उघडकीस
१२ जुलै रोजी फिर्यादीला एक फोन आला व कोटक बँकेतून एक व्यक्ती व्हेरिफिकेशनसाठी आल्याचे सांगितले. त्यानुसार बनावट व्हेरिफिकेशनसाठी एक व्यक्ती घरी येऊन आधारकार्ड, वीजबिल घेऊन फोटो काढून गेला. इतकेच नव्हे तर कोटक बँकेच्या नावाने बनावट ई-मेल व ओटीपीही पाठवण्यात आला. नरवडे यांनी प्रत्यक्ष कोटक बँकेत जाऊन चौकशी केली असता, अशी कोणतीही भरती प्रक्रिया आमच्याकडे नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतरच संपूर्ण फसवणूक उघड झाली.