पुणे/अक्षय फाटक: Pune Crime News: पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका विवाहितेने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्यासोबत इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. याघटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१) तसेच विष्णु देशमुख (वय ६) अशी याघटनेत मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत नर्सरीच्या वर्गाला शिकवत होती. तर पती शशिकांत हा एका बँकेत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आंबेगाव बुद्रुकमधील देशमुख कुटूंब कल्पक सृष्टी सोसायटी येथे राहण्यास होते. त्यांना विष्णु हा एक मुलगा होता. देशमुख कुटूंब मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात राहण्यास आहे.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मयुरी हिने आपल्या ६ वर्षांच्या विष्णु या मुलासह पाचव्या मजल्यावर जाऊन टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील नागरिक बाहेर आले. तेव्हा हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी येथे धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे.
मयुरीजवळ आढळली सुसाईड नोट
मयुरी हिने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. तिने एका पानावर नणंदेबाबत मजकूर लिहीला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे नणंदेच्या त्रासामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे म्हंटले आहे. त्यानंतर तिने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, घरी कोणी नसताना हा प्रकार घडल्याचे समजते.
वैष्णवीला झालेल्या मारहाणीबाबत मोठा खुलासा
वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे ३० खुणा आढळले आहे. यापैकी 15 जखमा आत्महत्या करण्यापूर्वी चोवीस तासांच्या आत असल्याची माहिती याआधीच समोर आली. वैष्णवीला सतत सासरच्या लोकांकडून आणि नवऱ्याकडून मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात आला. तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे झालेल्या जखमांवर भाष्य केले जात आहे.
दरम्यान, पाचही आरोपीचे मोबाईल फोन अद्याप पोलिसांच्या ताब्यात आले नव्हेत. त्यामुळे तपासात अडथळे येत होते. याच कारणास्तव पोलिसांनी न्यायालयात आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती केली होती. जेणेकरून मोबाईलचा शोध घेणे शक्य होईल. पोलिसांन जर आज हे मोबाईल हाती लागले तर वैष्णवीच्या मृत्यूमागचे अनेक गूढ उकलू शकतात, असे म्हटले जात आहे. तसेच वैष्णवीला 120 तास टॉर्चर करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.