पुण्यात प्रोफेसरच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आमदार धंगेकरांचा लेटर बॉम्ब; म्हणाले, ''ही मोठ्या बापांची...''
पुणे: पुण्याच्या दक्षिण भागात असलेल्या एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारातच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले जात असून, चारही मुले एकमेकांना ओळखत नसल्याचे समोर आले आहे. या मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी व वेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आता कसबा आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणावर लेटर बॉम्ब फोडला आहे. या पत्रातून लैंगिक अत्याचार झालेली मुलगी ही त्याच कॉलेजमधील प्रोफेसरची मुलगी असल्याचे समोर आले आहे. मात्र कॉलेज व्यवस्थापनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.
लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुलांपैकी काही मुले ही मोठ्या बापांची अवलाद असून त्यातील एक मुलगा हा उप-जिल्हाधिकारी (प्रात-अधिकारी) यांचा मुलगा असून संस्थेचे ट्रस्टी श्री सचिन सानप यांचे त्यांच्याशी गैरमार्गाचे आर्थिक हितसंबंध आहेत. त्यामुळे श्री सचिन सानप हे त्याच्या मुलाला वाचविण्याकरीता पीडित मुलीच्या वडिलांवर (प्राध्यापक) दबाव आणत आहे अशी चर्चा महाविद्यालयातील सेवक वर्गात चालू आहे असे समजते, त्यामुळे श्री. सचिन सानप, डॉ. अशोक चांडक आणि महाविद्यालयाचे अधिकारी यांची भूमिका ही अतिशय संशयास्पद आहे असे दिसून येते, असे धंगेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
कोरेगाव पार्क ड्रग्स पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे.
शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अश्या घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो, प्रत्येक… pic.twitter.com/w8t27CRM7S — Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) September 26, 2024
पुण्यातील कॉँग्रेस आमदार रविंद धंगेकर यांनी अत्याचार प्रकरणात सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. आमदार धंगेकर म्हणाले, ”कोरेगाव पार्क ड्रग्स पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अश्या घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो, प्रत्येक प्रकरणातील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु दरवेळेला अश्या घटनांना गुन्हेगारां इतकेच या व्यवस्थेतील घटक देखील जबाबदार असतात. आजच्या या घटनेतील सर्व माहिती माझ्या पत्रात मांडली आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना व पुणे शहराच्या पालकमंत्र्यांना ही विनंती राहील की आपण देखील या घटनेकडे तितक्याच गांभीर्याने पाहत घटनेतील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला इतके कठोर शासन करावे की पुन्हा कोणीही आशा प्रकारचे कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही.”
हेही वाचा: पुणे पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर कॉलेजमध्येच लैंगिक अत्याचार; आरोपींना अटक
अशी झाली घटना उघड
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी संबंधित महाविद्यालयात एका कार्यक्रमानिमित्ताने गेलेल्या होत्या. त्यांनी मुली व महिला अत्याचारप्रकरणात जनजागृतीपर माहिती दिली. तेव्हा मुलीच्या एका मैत्रिणीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली. तसेच, तिचा व्हिडीओही असल्याचे सांगितले. नंतर महिला अधिकाऱ्यांनी याप्रकरणात लक्ष घालून गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपींना अटकही केली.