
घाटातील त्या वळणावर अचानक बस पलटी; गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू
नाशिक : गुजरात महामार्गावरील करंजाळी-सावदा घाट परिसरात मंगळवारी रात्री खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. नाशिकहून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या या बसचा चालकाला वळण आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने ताबा सुटला. त्यानंतर बस रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता ही बस नाशिकहून अहमदाबादकडे जात होती. करंजाळी-सावदा घाट परिसरात बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच बस पलटी झाली. या अपघातात एका प्रवाशाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या प्रवाशाचाही मृत्यू झाला. महेंद्र पाल आणि राहुल ओझा अशी मृतांची नावे आहेत. दोघेही गुजरातचे रहिवासी असून, ते घरी जात होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, आरोग्य विभागाचे पथक आणि तहसीलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बस पलटी झाल्याने काही प्रवासी आत अडकले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. बसच्या खिडक्या आणि दरवाजे तोडण्याबरोबरच छतावरील एसीचे व्हेंटही तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
या अपघातात पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालय आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर घाट परिसरात काही काळ बचावकार्य सुरू होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.