नवी मुंबई/सावन वैश्य : नवरात्रोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, काही मंडळांनी ध्वनी मर्यादेचे नियम पाळले नाहीत. याच पार्श्वभूमीवर नेरूळ पोलिसांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. नेरूळ सेक्टर 16/18 मधील दोन मंडळे, सीवूड्स सेक्टर 23 मधील एक आणि नेरूळ सेक्टर 30 मधील एका मंडळावर ही कारवाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत वाजवण्यात आलेल्या डीजे आणि साऊंड सिस्टीममुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी नेरूळ पोलिसांकडे केल्या होत्या.
प्रशासनाने नवरात्रोत्सवापूर्वी सर्व मंडळांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की,मंडळांनी पोलीस, अग्निशमन, विद्युत विभाग आणि महानगरपालिकेच्या सर्व परवानग्या घ्याव्यात. ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांनुसार ठरवलेल्या वेळा आणि आवाजाची डेसिबल मर्यादा ओलांडू नये. रात्री 10 नंतर डीजे, बँड किंवा कोणताही मोठा साऊंड वापरण्यास मनाई आहे. तरीही काही मंडळांकडून या नियमांचे पालन झाले नाही. आवाजाची तीव्रता ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे मोजमापानंतर पोलिसांनी नोंदवले.
या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून चार मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांत विजय माने, सचिन रघुनाथ रामाने, कुणाल हिरामण निर्भवणे, शशांक पाडळे, प्रीतम भोसले आणि माधव गायकवाड या मंडळ पदाधिकाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत निर्धारित मर्यादा ओलांडल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे.
पर्यावरण विभागाच्या सूचनांनुसार,निवासी क्षेत्रात दिवसाची मर्यादा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आहे.वाणिज्यिक क्षेत्रात दिवसाची मर्यादा 65 डेसिबल आणि रात्री 55 डेसिबल आहे.या मर्यादेपेक्षा जास्त आवाज झाल्यास तो कायद्याने गुन्हा मानला जातो.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. “सण साजरे करणे चांगले, पण इतरांच्या त्रासाला कारणीभूत ठरू नये,” अशी प्रतिक्रिया अनेक रहिवाशांनी व्यक्त केली. काहींनी प्रशासनाने अशा नियमभंगावर कठोर कारवाई कायम ठेवावी, अशी मागणी केली आहे.
नेरूळ पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सण साजरे करणे हा आनंदाचा भाग आहे. मात्र, ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आगामी सणांमध्ये कोणत्याही मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.”