टँकरची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात डाॅक्टर तरुणाचा मृत्यू
पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टँकरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात डाॅक्टर तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या टँकरचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर भागात साेमवारी ही घटना घडली होती. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासवरून मार्ग काढत पसार झालेल्या टँकरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र एकनाथ तळेकर (वय ५१, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डाॅ. ईश्वर साहू (वय २९, रा. सातववाडी, हडपसर) असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे.
डाॅ. साहू हे मूळचे छत्तीसगडचे रहिवासी आहेत. ते हडपसर भागातील प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेत प्रशिक्षण घेत होते. हडपसर-सातववाडी रस्त्याने ते दुचाकीवरुन सोमवारी (२१ एप्रिल) निघाले होते. त्यावेळी पीएमपी थांब्यासमोर दुचाकीस्वार डाॅ. साहू यांना भरधाव टँकरने धडक दिली. अपघातानंतर टँकरचालक पसार झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या डाॅ. साहू यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी तुकाराम झुंजार, चंद्रकांत रेजीतवाड यांनी पसार झालेल्या टँकरचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. हडपसर-सासवड रस्त्यावरील सीसीटीव्ही पडताळले. यानंतर पोलिसांनी माग काढून तळेकर याला ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक हसीना शिकलगार तपास करत आहेत.
पुण्यात भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक
डेक्कन परिसरातील घोले रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कारचालकावर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेणुकदास नारायण जोशी (वय ६५) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालकावर गु्न्हा नोंद केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी योगेश जावळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रेणुकदास जोशी १५ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाशीची राणी चौकातून घोले रस्त्याकडे निघाले होते. झाशीची राणी चौकातील कोपऱ्यावर कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात जोशी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.