सणसवाडीत रस्ता ओलांडताना कारच्या धडकेत इसम ठार
शिक्रापूर : सणसवाडी (ता.शिरुर) येथील पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रस्ता ओलांडताना कारची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची नोंद शिक्रापूर पोलिसांत करण्यात आली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सचिन कमलाकर चक्रनारायण या कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश साठे (वय ४३, रा. पाटीलवस्ती सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) असे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सणसवाडी (ता.शिरुर) येथील पुणे ते अहिल्यानगर रस्त्याच्या लगत असलेल्या चंद्रमा हॉटेल समोरून गणेश साठे हे रस्ता ओलांडत असताना अहिल्यानगर बाजूने (एमएच १४ एलयु ५१८९) ही कार भरधाव वेगाने आली. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून कारची गणेश साठे यांना जोरदार धडक बसली. यावेळी गणेश साठे हे जोरात कारच्या काचेवर आदळले. कारही दुभाजकावर जाऊन आदळली.
दरम्यान, गणेश साठे हे यामध्ये गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याबाबत बापू रामभाऊ साठे (वय ४३, रा. पाटीलवस्ती सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालक सचिन कमलाकर चक्रनारायण (रा. डांगे चौक थेरगाव, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.
सांगली जिल्ह्यातही अपघात
जत-सांगोला महामार्गावर जतपासून चार किलोमीटर अंतरावर आयशर ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. यात दुचाकीवरील दोघे हे जत तालुक्यातील शेगाव येथील असल्याची माहिती दिली जात आहे.
समृद्धी महामार्गावरही अपघात
तर दुसऱ्या घटनेत, समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यात आता पुन्हा एकदा या मार्गावर अपघाताची घटना नुकतीच समोर आली आहे. मार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर कॉक्रीट टँकर धडकला. यात टँकरच्या क्लीनरचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे. सतीशसिंग विजयसिंग (वय 37) असे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रामचंद्र पाल (वय 36) असे टँकरचालकाचे नाव आहे.