माकडाने चालत्या दुचाकीवर उडी मारली अन्…; महाबळेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना
महाबळेश्वर : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अनेक लोकांना अघतातात आपला जीव गमवावा लागत आहेत. प्रशासन आणि पोलिसांकडूनही अपघाताच्या घटना थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरीही अपघाताच्या घटना घडत आहेत. अशातच आता महाबळेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवर माकडाने उडी मारल्याने दुचाकी घसरून अपघात झाला आहे.
या अपघातात उपचारापूर्वीच एकाचा मृत्यू झाला आहे. आनंद सखाराम जाधव (वय : ५०, रा. देवळी) असे मृताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी जखमी झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद जाधव हे गुरुवारी सायंकाळी महाबळेश्वरमधील आपली कामे उरकून पत्नीसोबत दुचाकीवरून देवळीला निघाले होते. तापोळा मुख्य रस्त्यावर चिखली परिसरात दुचाकीवर माकडाने झडप मारली, यामुळे दुचाकीस्वराचा ताबा सुटला व तोल जाऊन जाधव हे पत्नीसह रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, गंभीर जखमी अस्वस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात जाधव यांची पत्नी देखील जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद गुरुवारी रात्री उशिरा झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच देवळीसह परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या परिसरात खाद्याच्या शोधात असलेल्या एका माकडाने दुचाकीवर झडप टाकल्याने हा अपघात झाला झाला आहे.
पुणे ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढले
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत वाहनसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. औद्योगिक वाढ, शैक्षणिक व रोजगार केंद्रांचे विस्तार आणि नागरिकांचा खासगी वाहनांकडे वाढता कल या सर्व घटकांमुळे ग्रामीण रस्त्यांवर वाहनांचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वाढत्या वाहनताणाचा थेट परिणाम वाहतुकीच्या सुरळीततेवर तर होतच आहे, पण अपघातांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असल्याचे आकडेवारी स्पष्ट करते. २०२५ या एकाच वर्षात ग्रामीण भागात ८६० हून अधिक अपघात नोंदवले गेले. यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असून, अपघातांमध्ये ३०% वाढ झाल्याचेही नोंदवले गेले आहे.