महामार्गावर लूटमार करणाऱ्या परप्रांतीय टोळीला ठोकल्या बेड्या; तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा : राज्यात लुटमारीच्या घटना वाढल्या आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज, घरफोडी, दरोडे, लूटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे- बेंगलोर महामार्गावर कार अडवून कार मधील वीस लाखाचा मुद्देमाल चोरणे आणि चालकाला मारहाण करून त्याचे अपहरण करणे या गंभीर गुन्ह्यांमध्ये भुईंज पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी संयुक्तपणे कारवाई करून केरळ मधील सात जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम २० लाख व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर सहा आरोपी फरार आहेत.
कारला अडवून गाडीची तोडफोड
पुणे बेंगलोर महामार्गावर दिनांक १२ जुलै रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या दरम्यान आरोपींनी कारचा वापर करून एका दुसऱ्या कारला अडवून त्या गाडीची तोडफोड केली आणि गाडीतील चालकाचे अपहरण करून त्याच्याकडील वीस लाख रुपये रोख पळवले. चालकाला सर्जापूर फाटा तालुका जावळी येथे सोडून त्यांनी पलायन केले. याप्रकरणी विशाल हासबे (वय ३०, राहणार हिवरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली) यांनी भुईंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती
योगेवाडीत मुख्य आरोपीला अटक
पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सूचनेप्रमाणे भुईंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांचा संयुक्त तपास सुरू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस ठाण्याचे पतंग पाटील यांच्या दोन पथकाने सांगली, कोल्हापूर येथे नाकाबंदी करत या टोळीचा तपास केला. गुन्हा केलेली इनोवा, स्कार्पिओ, स्विफ्ट ही वाहने विटा- तासगाव या रस्त्याने सांगली जिल्ह्यात गेल्याचे समजले. सांगली पोलिसांच्या सहकार्याने भुईंज पोलिसांनी योगेवाडी (तालुका तासगाव) येथे गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनीथ ऊर्फ राजन याला अटक केली. त्यानंतर दोन्ही पथके केरळ राज्याकडे रवाना झाली.
दरोडा, अपहरण, मारामारीचे गंभीर गुन्हे
तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपास या माध्यमातून केरळ पोलिसांच्या सहकार्याने इतर सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील वीस लाख रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीवर केरळ मध्य प्रदेश तामिळनाडू, दिल्ली या राज्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या तपासात आतिश घाडगे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, अविनाश चव्हाण, अरुण पाटील, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, संकेत निकम, प्रवीण पवार, भुईंज पोलिस ठाण्याचे वैभव टकले, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, अमोल सपकाळ, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते, कराड शहर पोलिस ठाण्याचे अमलदार हिरामण बामणे, प्रफुल्ल गाडे यांनी सहभाग घेतला होता.