
तोतया पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप; महिलेला लॉजवर बोलावले अन्...
भिगवण : पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून त्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भिगवण पोलिसांनी जेरबंद केले आहे. गणेश शिवाजी कारंडे (वय ४३, रा. श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल ३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सोशल मिडियावर खोटे अकाउंट तयार
आरोपीने स्वतःचे नाव बदलून ‘संग्राम पाटील’ व ‘पृथ्वीराज पाटील’ या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खोटे अकाउंट तयार केले होते. पोलिस अधिकाऱ्यांचे फोटो वापरून स्वतःला पोलिस असल्याचा भास निर्माण करून महिलांशी विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फेसबुकद्वारे एका महिलेशी ओळख वाढवून ब्युटी पार्लरसाठी ६ लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर ‘माझ्या बायकोची बहीण’ म्हणून सही करावी लागेल, असे सांगून पीडितेला मौजे मदनवाडी (ता. इंदापूर) येथील लॉजमध्ये बोलावले. तेथे तिला दमदाटी करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि सोन्याचे दागिने, ६,००० रुपये रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ६४, ३०३(२), ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध विविध गुन्हे दाखल
आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध ठिकाणी अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार महेश उगले,सचिन पवार, संतोष मखरे, प्रमोद गलांडे, गणेश पालसांडे आणि वैष्णवी राऊत यांच्या पथकाने केली आहे.