आम्ही नीलेश चव्हाणला पकडून ठेवलंय अन् गाडीच्या डिकीत...; वैष्णवी मृत्यूप्रकरणात नेमकं काय घडतय?
पुणे : राज्यभरात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार असलेल्या निलेश चव्हाणला पकडल्याची खोटी माहिती देणाऱ्या एकाला नांदेड सिटी पोलिसांनी पकडले आहे. बक्षिस मिळावे, यासाठी त्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संतोष दत्तात्रय गायकवाड (वय ३३) याच्यावर नांदेड सिटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सरकारतर्फे पोलीस कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली आहे.
बावधन येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण राज्यभरात गाजत आहे. हगवणे कुटूंबाचा कौटुंबिक मित्र असलेल्या निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीचे बाळ जबरदस्तीने ठेवून घेतले. तसेच, ते आणण्यास गेल्यानंतर पिस्तूल दाखवून धमकावल्याच्या आरोपावरून वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा नोंद आहे. तेव्हापासून निलेश चव्हाण हा फरार आहे. त्याचा पुणे पोलीस व बावधन पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा पोलिसांच्या नियत्रंण कक्षास अज्ञाताने फोन करून ‘आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाणला पकडून ठेवले आहे. त्याच्याजवळ दोन पिस्तूल आहेत. आम्ही त्याला मारहाण करून गाडीच्या डिक्कीत ठेवले आहे.’ असे सांगितले. लागलीच ही माहिती नांदेडसिटी पोलिसांच्या मार्शलला देण्यात आली. मार्शल तत्काळ संबंधित कॉलनुसार किरकटवाडी येथील पानशेत रस्त्यावरील स्वागत हॉटेल येथे पोहचले. त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने खोटा कॉल केला असल्याचे आढळून आले.
चौकशीत त्याने दारूच्या नशेत कॉल केल्याचे समोर आले आहे. बक्षिस मिळेल यासाठी त्याने हा कॉल केला असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २१७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले.