पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारांनी धुडगूस घातला आहे. देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी नागरिक पोलिसांकडे करत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणातील पसार झालेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनां देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
करण शिवाजी जमादार (वय १९, रा. सिंहगड महाविद्यालयाजवळ, वडगाव बुद्रुक), शुभम साधू चव्हाण (वय १९, रा. रियांश सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, सचिन सरपाले व त्यांच्या पथकाने केली आहे.
गेल्या आठवड्यात (दि. ४ सप्टेंबर) तक्रारदारांचा मुलगा मित्रांबरोबर मोबाइलवर गेम खेळत होता. तेव्हा करण, शुभम आणि दोन अल्पवयीन साथीदार तेथे दुचाकीवरुन आले. त्यांनी पुर्वीच्या वादातून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता पोलिस कर्मचारी मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना पसार आरोपी करण, शुभम व अल्पवयीन मुलांची माहिती मिळाली. त्यानूसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले, तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनांना ताब्यात घेतले.
गाडी न दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला
कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने गाडी न दिल्याच्या रागातून लोखंडी पाईप एकाच्या डोक्यात मारला आहे. पाईप डोक्यात मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. निखिल नितीन घाडगे (वय 25 रा. साईनाथनगर भोनेमाळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आशादुल्ला हारुण जमादार (वय 27 रा. अशोक सायझिंगमागे) याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जमादार याला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असतानाही तो शहरात वावरत होता. ही घटना विसर्जन मिरवणूकीदरम्यान रात्री 9 वाजता घडली आहे.