वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट; अकरा आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल
पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु आहे. वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्यभरात गाजलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयात १६७० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. वैष्णवीचा पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण ११ आरोपींविरोधात पुणे न्यायालयात हे आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर ५८ दिवसांनंतर ठोस पुरावे संकलित करून आरोपपत्र दाखल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हुंडा व जमीन खरेदी करण्यासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २४, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) हिने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवीला मारहाण व जाच करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय ३१), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७, सर्व रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम), वैष्णवीच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून तिच्या नातेवाईकांना पिस्तुल दाखवून धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) आणि आत्महत्येच्या घटनेनंतर पसार झालेल्या राजेंद्र व सुशील हगवणेला आश्रय दिल्याप्रकरणी प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोनगोळी, ता. निपाणी, बेळगाव, कर्नाटक), मोहन उर्फ बंडू उत्तमराव भेगडे (वय ५९, रा. भेगडे वस्ती, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. भांगरवाडी, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५) व राहुल दशरथ जाधव (वय ४५, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव, सातारा) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात प्रत्येक आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग ठोस पुराव्यांसह अधोरेखित करण्यात आला आहे, अशी माहिती बावधन ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.
पाच जणांना आधीच जामीन
या प्रकरणात आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी आरोपी प्रीतम पाटील, मोहन उर्फ बंडू उत्तमराव भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव व राहुल दशरथ जाधव यांना न्यायालयाने पूर्वीच जामीन मंजूर केला आहे. या आरोपींवर जामीनपात्र गुन्हा दाखल करत त्यांना अटक करून पोलिस कोठडीची मागणी केल्याप्रकरणी बावधन पोलिसांना न्यायालयाने ताशेरेही ओढले होते.
लता, करिश्मा, निलेशचा जामीनासाठी अर्ज
हगवणे कुटुंबियांसह एकूण ६ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यापैकी लता हगवणे, करिश्मा हगवणे व निलेश चव्हाण यांनी जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यापैकी निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर आज (मंगळवारी) सुनावणी होणार असून, लता व करिश्माच्या जामीन अर्जावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या जामीन अर्जांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सर्व आरोपींविरोधात आरोप निश्चिती करून खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.