जेजुरीतील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; मृतांचा आकडा आला समोर
पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर झालेला भीषण अपघात हा ओव्हरस्पीडमुळे झाल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर, जखमीपैकी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात एकूण ९ जणांचा मृत्यू तर चार व्यक्ती जखमी झाले आहेत. ओव्हर स्पीडमध्ये गाडीवरील नियत्रंण सुटले आणि कारने थांबलेल्या पिअकपला उडिवले होते. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बुधवारी रात्री जेजुरी- मोरगाव रोड परिसरातील किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम ढाब्यासमोर हा अपघात झाला होता. ढाब्यासमोर पिकअप टेम्पो थांबला होता. त्यामधून दोन कामगार व ढाबा मालक साहित्य काढत होते. तेव्हा भरधाव कारने पिअकपला उडविले होते. त्यात जागीच ८ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ५ जण जखमी झाले होते. जखमीपैकी आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी हा अपघात कार ओव्हरस्पीडमध्ये असल्याने त्यावरील चालकाचे नियत्रंण सुटून झाल्याची शक्यता असल्याचे म्हंटले आहे. कारमधील ५ व्यक्ती, ढाबा मालक, दोन कामगार आणि रस्त्याच्या कडेला थांबलेला एक व्यक्ती यामध्ये मृत पावले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.