अंबिका कला केंद्रात गोळीबार; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे : पुणे जिल्ह्यातील केडगाव चौफुला जवळील ‘न्यू अंबिका कला केंद्रात’ भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह आलेल्या चौघांपैकी एकाने हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोळीबाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व इतर एक अशा चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत कला केंद्राचे मॅनेजर बाबासाहेब राजश्री अंधारे यांनी तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी (द. २१ जुलै) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास झाला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.
दौंड तालुक्यातील वाखारी हद्दीत ‘न्यू अंबिका कला केंद्र’ आहे. याठिकाणी बाळासाहेब मांडेकर व इतर कला केंद्रात आले होते. रात्री साडे आकराच्या सुमारास काही तत्कालीक कारणातून एकाने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. मात्र, त्याची तक्रार कला केंद्र किंवा इतरांकडून करण्यात आली नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. नंतर मात्र, हा प्रकार घडल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल यांना मिळाली. तत्काळ अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले.
चौकशी केल्यानंतर गोळीबार झाल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद केला. दरम्यान, गोळीबार नेमका कोणी केला ? हे समजू शकलेले नाही. यासंदंर्भाने अद्याप कोणाला पकडण्यात आलेले नाही. त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सुदैवाने गोळीबाराच्या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
पुण्यात दाबेली विक्रेत्या तरुणावर चाकूने हल्ला
पर्वती दर्शन परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पर्वती दर्शन भागात कच्छी दाबेली विक्रेत्या तरुणावर हल्ला केला आहे. तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करुन खून केला आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला अटक केली. दानिश नजरहसन सिद्धिकी (वय २५, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश प्रभाकर क्षिरसागर (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर पर्वती पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दानिश याची वहिनी मोनी सिद्धीकी यांनी तक्रार दिली आहे.