पुण्यात विवाहित महिलांच्या छळाची मालिका सुरुच; आता थार आणण्यासाठी...
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर विवाहतांच्या छळाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पुण्यात विवाहितेला माहेरहून “थार” गाडी आणण्यासाठी नव विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यासोबत दुसऱ्या दोन प्रकरणातही विवाहितांचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हडपसर, लोणी काळभोर तसेच फुरसुंगी पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ऊरळी देवाची परिसरातील एका २६ वर्षीय विवाहितेला माहेरहून “थार”गाडी घेऊन ये, अशी मागणी करुन तिचा छळ केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर पोलिांनी याप्रकरणी पती सौरभ सुनील सातव, सासू व सासरे सुनील (रा. उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता), नणंद, पतीची मैत्रीण, एक मावशी व इतर अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांचा ५ महिन्यांपूर्वी सौरभ सातव याच्याशी विवाह झाला होता. विवाहात हुंडा कमी दिला. माहेरहून थार गाडी घेऊन ये, अशी मागणी करुन आरोपींनी छळ केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोबडे तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत हडपसरमधील विवाहितेचा पती व सासूसह इतर नातेवाईकांनी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २४ वर्षीय विवाहितेने हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, पती रामदास धनशीर, सासू सुंदराबाई, दीर लक्ष्मण, उर्मिला कांबळे (सर्व रा. बिदर, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेचा सासू, पतीकडून छळ करण्यात आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. हवालदार शिंगाडे तपास करत आहेत.
तिसऱ्या घटनेत विवाहितेच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ केल्याच्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी पती राम जरिचंद तगारे, सासू, दीर राहुल, नणंद माधुरी संदीप पवार तसेच नणंद माधुरीचा पती संदीप पवार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार गुरव तपास करत आहेत.