गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 'इतक्या' कोटींना घातला गंडा
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहे. फसवणुकीच्या घटनांना बळी न पडण्यासाठी पोलिसांकडूनही वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र तरीही घटना वाढलेल्या दिसून येत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची १ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यावसायिकाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, राजीव अशोक केंद्रे (रा. एलेजियम सोसायटी, पिंक सिटी रस्ता, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार रावेत भागातील असून, ते व्यावसायिक आहेत. केंद्रे आणि त्यांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. केंद्रे याचे बाणेर भागात खासगी कार्यालय होते. त्याने तक्रारदारांना शेअर बाजार तसेच परकीय मुद्रा व्यवहारात (फॉरेक्स ट्रेडिंग) गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगत त्यांच्याकडून केंद्रे याने वेळोवेळी १ कोटी १२ लाख रुपये घेतले. गुंतवणूक केल्यानंतर त्यांना सुरुवातीला परतावा दिला. त्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते अधिक तपास करत आहेत.
दाम्पत्याची फसवणूक
मूल होण्याचे औषध देण्याच्या नावाखाली दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली. तसेच त्यांचे दागिने घेऊन भोंदूबाबा पसार झाला होता. नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत भोंदूबाबास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. नागेश राजू निकम (वय ३६, रा. निमनिरगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिरज तालुक्यातील एका गावात ही घटना घडली होती. या दाम्पत्याला मूलबाळ होत नव्हते. याचा फायदा घेत संशयित नागेश निकम याने त्यांना मूल होण्याचे औषध देण्याचे आमिष दाखवले. गेल्या रविवारी ३१ ऑगस्ट रोजी तो त्यांच्या घरी आला. औषध देण्यापूर्वी त्याने धार्मिक विधी करण्याचे नाटक केले. त्याने दाम्पत्याला घरातील देवघरात बसवले आणि महिलेच्या अंगावरील सर्व दागिने एका कापडात बांधून एका हंड्यात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर दाम्पत्याला २० मिनिटे एकाच जागी बसून राहण्यास सांगितले आणि आपण मंदिरात जाऊन येतो, असे खोटे सांगून तो दागिने घेऊन पसार झाला होता.