
Pune News: पुण्यात मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई; संतोष पंडितांना अटक, ‘हीच आमची लायकी’ म्हणत मोबाईल-बेल्ट कुटुंबीयांकडे दिला
घराबाहेर नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास पोलिसांचे पथक दोन वाहनांमधून संतोष पंडित यांच्या घरी पोहोचले. काही पोलीस कर्मचारी साध्या वेशात असल्याचे सांगण्यात येत आहे. पंडित यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी मोबाईलवरून या कारवाईचा व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. पोलिस मध्यरात्री घरात आल्याचे सांगत संतोष पंडित यांनी नाराजी व्यक्त केली. “आमच्यासारख्यांची हीच लायकी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच पोलिसांना सहकार्य केले नसेल तर त्याबद्दल माफी मागत असल्याचेही त्यांनी म्हटले.
मोबाईल आणि बेल्ट काढून कुटुंबीयांकडे दिला
पोलिसांच्या वाहनात बसण्यापूर्वी संतोष पंडित यांनी आपला मोबाईल, गाडीची किल्ली आणि कमरेचा बेल्ट काढला. या वस्तू त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे दिल्या. पोलिसांना कोणत्या वस्तूंची आवश्यकता नसते, याची आपल्याला माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मध्यरात्री झालेल्या पोलिसांच्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे वाद
संतोष पंडित हे पुणे शहरातील विविध विकासकामांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने भाष्य करतात. पुणे महापालिकेच्या कामांमधील त्रुटी, नागरिकांच्या समस्या आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर ते व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत असतात. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप असलेली एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ‘राजकारण एक्सप्रेस’ या सोशल मीडिया पेजवरून प्रसारित झालेल्या संबंधित व्हिडीओमध्ये लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, असा दावा करण्यात आला होता. मात्र, या टीकेसोबत अश्लील आणि शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.
पोलिसांकडून पुढील तपास
या तक्रारीनंतर संतोष पंडित आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मध्यरात्री कोथरूड पोलिसांनी पंडित यांच्यावर कारवाई केली. मात्र, मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईमागील नेमके कायदेशीर कारण आणि कोणत्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आले, याबाबत पोलिसांकडून अधिकृत आणि सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.