पुणे पोलिसांची मोठी कारवाई; FC कॉलेजमधून बॅटऱ्या चोरणाऱ्यांना केली अटक
पुणे : पुण्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे. पुण्याचील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता एफसी कॉलेजच्या कॉम्पसमधील आयएमडीआर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या युपीएस रूममधील तब्बल ४३ बॅटऱ्या चोरी गेल्याचे समोर आले आहे. या चोरीनंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासात बॅटरी चोरणाऱ्यांना पकडले आहे. कॉलेजच्या कॉम्पसमध्येच चोरी झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. सचिन शहाजी डोकडे (वय २१, रा. वडारवाडी) व राहुल यंकाप्पा पाथरूट (वय २०) अशी अटक केलेल्या चोरांची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले यांच्या पथकाने केली आहे.
एफसी कॉलेजच्या कॉम्पसमध्ये आयएमडीआर येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची युपीएस रूम आहे. यात कॉलेजचा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर बॅटरी बॅकअप देऊन वीज पुरविण्यासाठी युपीएस सिस्टीम बसविलेली होती. तेथे तब्बल ४३ बॅटऱ्यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स साहित्य होते. दरम्यान, ४ नोव्हेंबरला रूममधून तब्बल ४३ बॉटरी चोरीला गेल्याचे समोर आले. नंतर कॉलेजच्या प्रशासनाने तातडीने डेक्कन पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली होती.
लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी पथकाला सूचना देत आरोपीचा माग काढण्यास सांगितले. पथकाने येथील सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक तसेच खबऱ्यांच्या माहितीवरून सचिन व राहुल या दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दिवाळी संपताच लुटमारीच्या घटना
दिवाळी संपली अन् शहरात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ सुरू झाला असून, लूटमार करणाऱ्या चोरट्यांनी धनकवडी, खराडी, हडपसर भागात लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत ३४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार या त्यांच्या सूनेसोबत सोमवारी दुपारी बालाजीनगर परिसरातून पायी चालत जात होत्या. तेव्हा काशीनाथ पाटील नगर येथे पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहायक निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : व्यावसायिकाची कार अडवून लुटण्याचा प्रयत्न; दांडेकर पुलाजवळील घटनेने खळबळ
चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
दरम्यान लक्ष्मीपूजनच्या मध्यरात्री चोरे (ता. कराड) गावच्या हद्दीत चार अनोळखी चोरट्यांनी सोपान मनोहर गोळे, बाबुराव मारुती गोळे, चंद्रकांत बाबुराव भोसले, सुनंदा संजय साळुंखे यांच्या घरातील सुवर्ण अलंकार, चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास केले. शुक्रवारी (दि. २) मध्यरात्री पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद सोपान मनोहर गोळे यांनी उंब्रज पोलिसांत दिली आहे.