रेल्वेच्या 'ऑपरेशन अमानत'ला चांगलं यश; तब्बल 4 कोटी 60 लाखांच्या वस्तू मूळ मालकांना परत
अकोला : रेल्वे सुरक्षा दलाने जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 4 कोटी 60 रुपयांच्या वस्तू आणि साहित्य शोधले. मध्य रेल्वेच्या ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या हरवलेल्या व विसरलेल्या मौल्यवान वस्तू परत केल्या आहेत. रेल्वे विभागाच्या तत्पर प्रतिसादाबद्दल प्रवाशांनी भारतीय रेल्वेचे आभार मानले आणि कौतुकही केले.
हेदेखील वाचा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; आता ‘या’ दिवशी घेतली जाणार परीक्षा
रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांच्या पर्स, बॅग, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, क्रेडिट, डेबिट कार्ड यासारख्या मौल्यवान वस्तू गाड्यांमध्ये आणि रेल्वेस्थानकांवर विसरल्याच्या आणि गहाळ झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. यातील बहुतेक प्रकरणांमध्ये तक्रार नोंदवली गेली की नाही, याची पर्वा न करता रेल्वे कर्मचाऱ्यांनी तपास व शोधकार्य सुरू ठेवले. तसेच बहुतांश प्रकरणांमध्ये अतिशय तत्परतेने प्रतिसाद दिलेला आहे.
चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत, रेल्वे सुरक्षा दलाने सुमारे 4 कोटी 60 लाख रूपये किमतीचे 1 हजार 306 प्रवाशांचे सामान परत केले आहे. यामध्ये बॅग, मोबाइल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान आदी वस्तूंचा समावेश आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना कर्तव्यादरम्यान प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामनाही करावा लागतो.
रेल्वे सुरक्षा दलाच्या या सैनिकांनी अत्यंत समर्पण भावनेने आणि सतर्कतेने तसेच मोठ्या धैर्याने आपली कर्तव्ये पार पाडली आहेत. यामध्ये पॉइंट्समन पूजा यांना एटीएम कार्ड, पासबुक, एफडी पावत्या, कागदपत्रे इत्यादींसह 10 हजार रोख असलेली बॅग ही सापडली, त्यांनी ती तात्काळ त्या स्थानकाच्या स्टेशन मास्टरकडे सोपवली.
काही चौकशी करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या पासबुकच्या मदतीने मालकाचा शोध घेण्यात आला. तेव्हा बॅग जॉन पीटर या ज्येष्ठ नागरिकाची असल्याची माहिती मिळाली. त्यांना फोन करून बोलावून घेतले गेले व ती बॅग परत देण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी नेहमीच रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जागरुक असतात, तसेच ते जीवन वाचवण्यासाठी, हरवलेल्या वस्तू परत शोधून देण्यासाठी व भटकलेल्या व्यक्तींना योग्य दिशा देण्यासाठी कार्यरत असतात.
आरपीएफची गरजू प्रवाशांना मदत
रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, ‘अमानत’ या ऑपरेशन अंतर्गत रेल्वे सुरक्षा दल त्यांच्या कर्तव्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत करत आहे. त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाइल फोन, लॅपटॉप, प्रवाशांचे मौल्यवान दागिने, रोख इ. यासारख्या वस्तू परत मिळवून देण्याचे काम करत आहे.
हेदेखील वाचा ; गरिब विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची चिंता मिटली; केंद्र सरकारकडून ‘विद्यालक्ष्मी योजना जाहीर; काय आहे योजना?