फोटो सौजन्य- iStock
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, UPSC 2025 च्या वार्षिक वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. हे सुधारित वेळापत्रक https://www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा ; गरिब विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची चिंता मिटली; केंद्र सरकारकडून ‘विद्यालक्ष्मी योजना जाहीर; काय आहे योजना?
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या वेळापत्रकानुसार नागरी सेवांच्या प्राथमिक परीक्षेसाठीची नोंदणी आता 22 जानेवारी रोजी सुरू होणार असून, परीक्षा 25 मे 2025 रोजी पार पडेल. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही ‘यूपीएससी’ ने आपले वेळापत्रक बदलले होते. नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा आणि भारतीय वनसेवा (प्राथमिक) परीक्षा यांच्यासाठीची नोंदणी प्रक्रिया 22 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. ही प्रक्रिया 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, प्रत्यक्ष परीक्षा 25 मे रोजी घेतली जाणार आहे.
नागरी सेवेसाठीची मुख्य परीक्षा 22 ऑगस्टला होणार आहे. तसेच भारतीय वन सेवेसाठीची मुख्य परीक्षा 16 नोव्हेंबर 2025 ला होईल. या नव्या वेळापत्रकानुसार लष्करात अधिकारी पदावर जाण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांच्या परीक्षेच्या तारखाही बदलल्या आहेत. त्यानुसार एनडीए, एनए आणि सीडीएस या परीक्षांची अधिसूचना 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध होणार आहे. या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असणार आहे.
वैद्यकीय सेवा परीक्षेच्या तारखाही जाहीर
नव्या वेळापत्रकात संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेबाबतच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 ची अधिसूचना 19 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 11 मार्च असेल. तर लेखी परीक्षा 20 जुलै 2025 रोजी होणार आहे. आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया 12 फेब्रुवारी ते 4 मार्च असेल. त्यानुसार, ही परीक्षा 20 जून रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यूपीएससी ही एक नागरी सेवा परीक्षा
UPSC ही राष्ट्रीय स्तरावरील एक सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आहे ज्याद्वारे 24 सेवांमध्ये भरती केली जाते. IAS, IPS, IRS अश्या एकूण 24 सेवांची भरती यूपीएससी परीक्षेआधारीत केली जाते. भारतात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परिक्षांपैकी यूपीएससी एक आहे. यूपीएससी ही एक स्वतंत्र संस्था आहे.
यूपीएससीचा पेपरफुटल्याचा आरोप
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) यूपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला होता. यूपीएससीच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचा 20 सप्टेंबर रोजी पेपर झाला होता. मात्र, निबंधाचा पेपप रद्द करण्याची मागणी परीक्षार्थींकडून केली जात आहे. कारण, खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांना पेपर आधीच मिळाल्याचा आरोप परीक्षार्थींकडून करण्यात आला होता.