फोटो सौजन्य - Social Media
कवठी अन्नशांतवाडी येथे झालेल्या संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय ४२) यांच्या खून प्रकरणात फरार असलेले रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (वय ४०) आणि शैलेश दत्ताराम करलकर (वय ४३, दोघेही रा. कवठी वाडीवाडा) या दोघांना निवती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चेंदवण-निरुखेवाडी येथून अटक केली. या दोघांना सोमवारी कुडाळ न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात आधीच अटक केलेल्या श्यामसुंदर प्रभाकर वाड्येकर यासह आता आरोपींची संख्या तीन झाली आहे. संदीप करलकर यांच्या खुनामागील कारण काजूच्या बागेत चोरी आणि त्यानंतर झालेला वाद असल्याचे समोर आले आहे.
२७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता, दादा करलकर, शैलेश करलकर आणि कामगार शामसुंदर वाड्येकर हे संदीप करलकर यांच्या घरी गेले. त्यांनी संदीप करलकर यांना जाब विचारताच दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि काही वेळातच हातघाईची मारामारी झाली. तणाव वाढत गेला आणि वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. या झटापटीत दादा करलकर, शैलेश करलकर आणि शामसुंदर वाड्येकर यांनी संदीप करलकर यांना बेदम मारहाण केली. मोठ्या प्रमाणात मार लागल्याने संदीप गंभीर जखमी झाले.
या मारहाणीत संदीप यांच्या मानेचा मणका तुटला आणि त्यामुळे त्यांना जोरदार रक्तस्त्राव सुरू झाला. गंभीर अवस्थेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ही घटना घडल्यावर कोणत्याही व्यक्तीने तात्काळ पोलिसांना कळवले नाही. जवळपास २४ तास उलटून गेल्यानंतर, अखेर २८ फेब्रुवारी रोजी पोलिसांना याची माहिती मिळाली. या विलंबामुळे तपासात अनेक अडचणी निर्माण झाल्या, परंतु पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत प्रथम श्यामसुंदर वाड्येकरला अटक केली. त्यानंतर फरार असलेल्या दादा करलकर आणि शैलेश करलकर यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले. तपासदरम्यान काही महत्त्वाच्या सुगावा मिळाल्याने अखेर चेंदवण-निरुखेवाडी येथे त्यांचा ठावठिकाणा सापडला. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोमवारी या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार असून, या खून प्रकरणात अजून कोणी सहभागी होते का? याचा तपशीलवार तपास पोलीस करत आहेत. तसेच, या हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते, आरोपी आणि मृतामध्ये आधीपासून कोणतेही वैयक्तिक वाद होते का, मारहाणीच्या वेळी आणखी कोणी उपस्थित होते का, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.