“धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि अजित पवारांनी...”; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान
बीड जिल्ह्यातील मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने ढवळून निघाला.या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन समितीकडून सुरु आहे.यातच आज करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठा दावा केला. धनंजय मुंडे हे उद्या राजीनामा सादर करणार असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला. यानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही याबाबत मोठं विधान केलं आहे. “धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि याबाबतचा निर्णय अजित पवार यांनी देखील घेतला पाहिजे”, असं त्यांनी म्हटलं आहे.
रामदास आठवले नक्की काय म्हणाले?
करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत धनंजय मुंडे हे राजीनामा देणार असल्याचा दावा केला. करुणा मुंडे यांच्या या दाव्यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “करुणा मुंडे यांना माहिती मिळाली असेल तर त्याबद्दल मला माहिती नाही. एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची सगळी माहिती सीआयडीला मिळाली आणि त्याबाबतची भूमिका स्पष्टपणे समोर आली”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
“मला असं वाटतं की, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा जवळचा संबंध होता. पण या घटनेत धनंजय मुंडेंचा काहीही संबंध नाही. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. मला असं वाटतं अजित पवार यांनी याबाबत विचार करणं गरजेचं आहे. नीतिमत्तेच्यापेक्षा मंत्रिपद फार मोठं नाही. खूनाच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही. पण त्या घटनेतील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा होता. त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि तसा निर्णय अजित पवारांनी घेतला पाहिजे”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.