चोरट्याने 'ॲपल'चे घड्याळ चोरले अन् घबाडच...; सासवड पोलिसांची धडक कारवाई
सासवड : घडाळ चोरीच्या आरोपावरून एका आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याकडून अधिक तपास केला असता, पोलिसांनी तब्बल आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. गणेश मंजाप्पा (वय ३०, रा. घर नं. ५२५ उदयराजा पालायम, ता. तोटाल्लम जिल्हा अंबुर वेल्लोर तामिळनाडु) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्यला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. वल्लकोंडा राजानरसिंमा रेडी( वय २०, रा. हनमकोंडा, जि वरंगल, तेलंगणा) या सॉफ्टवेअर इंजिनिअरने सासवड पोलीस ठाण्यात घटनेची फिर्यादी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हडपसर मगरपट्टा येथील कंपनीत नोकरीस असून, १ जानेवारी रोजी सकाळी साडे सहा वाजता त्यांच्या मित्रासह सासवड येथील संगमेश्वर मंदीरात दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर सासवडवरून हडपसरला जाण्यासाठी सासवड येथील पीएमटी बसमध्ये बसले. तसेच तिकीट काढण्यासाठी बॅग चेक केली असता बॅगची चैन कोणीतरी उघडली असल्याचे लक्षात आले. तसेच बॅगमध्ये ॲपल कंपनीचे घड्याळ व पाकीटातील क्रेडीट कार्ड, आयकार्ड, पॅन कार्ड, डेबिटकार्ड, आणि रोख २ हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी सासवड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपीचे लोकेशन घेतले असता आरोपी पुरंदर हायस्कूल समोरील झोपडपट्टी मध्ये आढळून आला. त्याठिकाणी पाहणी केली असता सदर आरोपी आढळून आला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून अधिक तपास केला असता तब्बल आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल संच चोरल्याचे उघड झाले.
पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पोलीस हवालदार सुरज नांगरे, रुपेश भगत, आबासो बंकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर कोरडे, अक्षय चिले, प्रणय मखरे, विकास ओमासे, तुषार लोंढे यांच्या पथकाने कारवाई केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरघे करीत आहेत.
आरोपी अलगद जाळ्यात
दरम्यान फिर्यादी वल्लकोंडा रेडी यांचे घड्याळ सुमारे ५० हजार रुपये किमतीचे असून त्यांनी ते घड्याळ त्यांच्याकडील आयफोनला कनेक्ट केले होते. त्यामुळे घड्याळाची चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मोबाईलमध्ये लोकेशन चेक केले असता पुरंदर हायस्कूल परिसरात असल्याचे दिसून आले. तसेच हायस्कूलच्या समोरील झोपडपट्टी मध्ये थेट लोकेशन आढळून आल्याने आरोपी काही वेळातच सहज मिळून आला. त्याच्याकडून चोरीचे घड्याळ तर मिळालेच त्याच बरोबर आतापर्यंत चोरून आणलेले विविध नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप आणि महागडे मोबाईल संच आढळून आले.
हे सुद्धा वाचा : Crime News : पुण्यात कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत; वाहनांची तोडफोड केली अन्…
सासवड पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन
सासवड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून एकूण आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल संच जप्त केले असून, त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत किंवा एखाद्या टोळीशी संबंध आहेत का? या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. दरम्यान यापूर्वी ज्या व्यक्तींचे मोबाईल, लॅपटॉप चोरीला गेले आहेत किंवा चोरीची तक्रार दिली असेल, अशा व्यक्तींनी सासवड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले आहे.