सौजन्य फोटो - टीम नवराष्ट्र
मोहोळ : तालुक्यातील शेटफळ गावात पूर्ववैमनस्य, धार्मिक प्रथा आणि शेळ्या शेतात गेल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या संघर्षात भारतीय सैन्यातील एका जवानासह दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
२३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजमाता दूध संकलन केंद्रासमोर पहिली घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शेळ्या चरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर भारतीय सैन्यातील जवान सुमित उत्तरेश्वर खडके आणि त्यांचे चुलत भाऊ राम वसंत खडके दूध संकलन केंद्रावर गेले होते. यावेळी काही जणांनी त्यांना घेरून मारहाण केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, सुमित खडके यांच्या डोक्यावर सत्तूरने वार करण्यात आला. राम खडके यांनाही मारहाण झाली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या व्यक्तींवरही हवेच्या पंपाने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हाणामारीदरम्यान राम खडके यांच्या खिशातील ११ हजार रुपये तसेच सुरज खडके यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रार दिल्यास अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी राम खडके यांच्या तक्रारीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील श्रावण सोमवारी सिद्धेश्वर मंदिरातील पादुकांना हार घालण्यावरून वाद झाल्याची पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येते. याच पूर्ववैमनस्यातून २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास परिस्थिती पुन्हा चिघळली. भीमनगर परिसरात १०० हून अधिक लोकांचा जमाव जमल्याचा आरोप आहे. पोलिस बंदोबस्त असतानाही जमावाने अरविंद सिद्धेश्वर थोरात यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी पाइप आणि काठ्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अरविंद थोरात यांच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याशिवाय परिसरातील इतर घरांमध्येही तोडफोड आणि मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ३६ नामनिर्देशित व्यक्ती आणि १०० हून अधिक अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न, दंगल आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी शेटफळमध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रांताधिकारी सचिन इथापे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप, सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे आणि पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप करत आहेत.






