पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, वैष्णवीच्या अंगावर तब्बल २९ मारहाणीचे व्रण आढळले असून, त्यातील ५ ते ६ जखमा आत्महत्येच्या अगदी काही तासांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे अत्यंत गंभीर असून, तिच्यावर सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी न्यायालयात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
– हगवणे कुटुंबीयांच्या सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत
वैष्णवीच्या नावावरचं सोनं तारण ठेवून त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर कुठे झाला, हे अद्याप स्पष्ट नाही.
या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीयांमधील संबंधांचा तपास करणे गरजेचे आहे.
– तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती.
सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल?
पोलिसांच्या तपासात, वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला आहे.
वैष्णवी मृत्यू प्रकरणात नीलेश चव्हाण सहआरोपी
वैष्णवी शशांक हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या बावधन पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १७ मे) गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ८० (२), १०८, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ११८ (१), ३ (५) प्रमाणे बावधन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे असा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, वैष्णवी हिच्या मृत्यूनंतर तिचे दहा महिन्यांचे बाळ नीलेश चव्हाण याच्याकडे असल्याचे समोर आले. त्यानंतर वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र, नीलेश चव्हाण याच्याकडे असताना बाळाची हेळसांड झाली, अशी तक्रार कस्पटे कुटुंबियांनी केली. त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली. वैष्णवी हिच्या आत्महत्येनंतर दाखल केलेल्या हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात ही कलम वाढ केली आहे.