सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या; कळमनुरीच्या शिवारात गळफास घेऊन संपवलं जीवन
हिंगोली : हिंगोलीच्या शेंबाळपिंपरी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात सख्ख्या भावानेच धाकट्या भावाची हत्या केली होती. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपी भावाने कळमनुरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली.
शेंबाळपिंपरी (ता.पुसद) येथे दुचाकी नेण्याच्या किरकोळ कारणावरून सख्ख्या भावंडांत वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, थोरल्याने धाकट्या भावाची हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंबाळपिंपरी (ता. पुसद) येथील मनीष जयवंता शिरफूले (वय 23) याचा त्याचा भाऊ दिनेश जयवंता शिरफुले (वय 21) याच्यासोबत दुचाकीबाहेर नेण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादात मनीष याने दिनेश याला मारहाण केली.
हेदेखील वाचा : क्षुल्लक कारणावरून भावंडांमध्ये वाद; थोरल्याने धाकट्या भावावर फावड्याने केला हल्ला, डोक्यातच…
या मारहाणीत दिनेश खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याच्या पाठीमागे लोखंडी फावड्याने वार केला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खंडाळा (ता. पुसद) पोलिस ठाण्यात 29 मार्च रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मनीष हा फरार झाला होता.
खंडाळा पोलिसांचे पथक होते मागावर
खंडाळा पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, तो सापडला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढले असता तो कळमनुरी शिवारात असल्याची माहिती मिळाली होती. कळमनुरी पोलिसांनी शोध घेतला असता मनीष याचा मृतदेह कळमनुरी शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. असे असताना क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच भावाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता आरोपीनेच गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.