
टेंभुर्णीजवळ टॅंकरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकाचा जागीच मृत्यू, सकाळीच ड्युटी संपवली अन्...
टेंभुर्णी : गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यात सोलापूरच्या टेंभुर्णीत एक भीषण अपघात झाला. टॅंकरने दुचाकीला मागून धडक देऊन झालेल्या अपघातात बादलेवाडी (ता.माढा) येथील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१७) दुपारी बाराच्या सुमारास विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या जवळ झाला.
सुरेश सोमनाथ सरक (वय ४०) व मुलगा अभिजित सुरेश सरक (वय २१) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. याबाबतची अधिकी माहिती अशी की, सुरेश सोमनाथ सरक व त्यांचा मुलगा अभिजित सुरेश सरक हे दोघे त्यांचा मंगळवारी ढवळस येथील देवीचा देवदेव असल्याने त्याच्यासाठी लागणारा बाजार आणण्यासाठी टेंभूर्णीकडे आपल्या दुचाकीवरून जात असताना टॅंकरने पाठीमागून धडक दिली. या झालेल्या अपघातात दोघे पिता-पुत्र टॅंकरच्या चाकाखाली आले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : Accident: कोपरगावजवळ भीषण अपघात! बस-कार धडकेत कारचालकाचा होरपळून मृत्यू; अनेक प्रवासी जखमी
दरम्यान, याप्रकरणी टॅंकर चालक छगन विठल माने (रा. तांबवे ता. माढा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
सर्वांना दिले होते जेवणाचे आमंत्रण
सरक पितापुत्र यांचा ढवळस येथील देवीला मंगळवारी देवदेव होता. सोमवारी सकाळी सर्वांना जेवणासाठी आमंत्रण दिले होते. परंतु, त्यांना टेंभूर्णीला बाजारहाट आणण्यासाठी जात असताना वाटेतच मृत्युने गाठल्याने बादलेवाडी गावावर शोककळा आली आहे. तर मयत अभिजित सुरेश सरक हा महिन्यांपूर्वीच विठ्ठलराव शिंदे कारखान्यात सिक्युरिटी म्हणून कामाला लागला होता.
कोपरगावजवळही भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, कोपरगावाजवळ नगर- मनमाड महामार्गावर रात्री भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. खाजगी बस आणि कारची भीषण धडक झाली. या धडकेत कारणे पेट घेतला आणि यात कारचालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहे. या अपघातानंतर हायवेवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, वाहतूक कोंडी झाली होती. मुजाहिद शेख (वय 31) असे मृत चालकाचे नाव असून त्याच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.