संग्रहित फोटो
गंगाखेड : दुकानावरून बिस्कीट पुडा आणण्याकरता गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने पकडून घरात नेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ३ वर्ष सश्रम करावास व १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गंगाखेडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश २ व्ही.एम. सुंदाळे यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले. दिनांक ११ सप्टेंबर रोजी बाल लैंगीक अत्याचार कायद्या अंतर्गत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ३ वर्ष सश्रम करावास १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड पोलिस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुलगी दुकानावरून बिस्कीट पुडा घेऊन येताना आरोपीने बळजबरीने पकडून आपल्या घरात नेऊन तिचा विनयभंग केला. घडलेली घटना मुलीने आपल्या आईला सांगितली. मुलीच्या आईने दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून ओंकार उर्फ दाद्या गोपाळराव सकट या आरोपीविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात बाल लैंगीक अत्याचार कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गंगाखेड पोलिसांच्या जलद तपासाला यश
सदरील घटनेचा जलद गतीने तपास करून अवघ्या १५ दिवसांमध्ये तपासाची चक्रे फिरवत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. इंगळे यांनी तपास करून अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाखेड यांच्या न्यायालयात प्रकरण चालविले.
सरकारी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासले
पीडितेची आई व जन्म नोंदणी पुरावा आणि तपासिक अंमलदार यांची साक्ष गृहीत धरून बाललैंगीक अत्याचार कायद्याअंतर्गत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने ३ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सदरील प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता डी.यू. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.बी. पौळ यांनी बाजू मांडत पीडितेला जलदगतीने न्याय मिळवून दिला. याप्रकरणी सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.डी. वाकोडकर तसेच गंगाखेड पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरविकार महिला पोलीस शिपाई एस.एस. जिंकलवाड, जे.एच. पठाण, कोर्ट पैरवीकार एम.डी. कुंडगीर, महिला पोलीस हवालदार एल.व्हि. मुंडे यांनी काम पाहिले.






