
शाळकरी मुलीचे अपहरण करुन बलात्कार; न्यायालयाने आरोपीला सुनावली 'ही' मोठी शिक्षा
चंद्रशेखर दीपक वनशिवे (वय ३२, रा. पारगाव, ता. दौंड) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. शिरूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली होती.
पीडित मुलीची आई मजुरी करते. महिला, तिचे पती, पीडित नऊ वर्षाची मुलगी आणि तिचा लहान भाऊ असे त्यांचे कुटुंब होते. वनशिवे तेथे कामास जात होता. त्यामुळे त्याची ओळख झाली होती. खाऊच्या आमिष दाखवून त्याने चौथीत शिकणाऱ्या मुलीला पळवून नेले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित मुलीला गावात सोडून पसार झाला होता.
शिरुर पोलीस ठाण्यातील तत्कालिन सहायक निरीक्षक बी. एन. काबुगडे यांनी याप्रकरणाचा तपास करुन आरोपीवर आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी बाजू मांडली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो ) आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावाासची तरतूद शिक्षेत करण्यात आली. न्यायालयीन कामासाठी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, उपनिरीक्षक विद्याधर निचित, हवालदार बाळासाहेब गदादे, शिपाई रेणूका भिसे, रोहित बाचल यांनी सहाय केले.
पीडित मुलीला ५ लाख रुपये देण्याचे आदेश
पीडित शाळकरी मुलीवर बलात्कार झाला. तेव्हा ती चौथीत होती. पीडित मुलीला पाच लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. बलात्कार प्रकरणात पीडित महिला, मुलीला ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत शासनाकडून मदत दिली जाते. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज दाखल केल्यानंतर ही मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत अनेक पीडितांना मदत देण्यात आली आहे. पीडित महिला किंवा मुलींना व्यवसाय, तसेच शिक्षणासाठी या निधीचा वापर करता येतो.