पाटणा– सासवा आपल्या मुलीपेक्षा (Daughter) जास्त प्रेम (love) जावयावर (son in law) करतात, असं म्हणतात. मात्र समोर आलेल्या या घटनेनं या नात्याबाबतच प्रश्न उपस्थित केलेलं आहे. मिथिलात एका सासूनं क्रूरता दाखवत, आपल्या मुलीलाच विधवा करण्यासाठी जावयाच्या हत्येचं प्लॅनिंग केल्याचं समोर आलंय. संधी मिळताच तिनं या तरुणाच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि बिचाऱ्या जावयाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या जावई हॉस्पिटलमध्ये एडमिट असून, त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरु आहे.
जावई आवडत नव्हता म्हणून टोकाचं पाऊल
बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आलेला आहे. सासूनंच आपल्या जावयाला जिवंत जाळण्याचा प्रकार केल्याचं समोर आलंय. जावई आवडत नव्हता, या कारणासाठी या सासूनं हे कृत्य केलंय. या आरोपी महिलेच्या मुलीनं घरच्यांच्या परवानगीविना एका तरुणाशी प्रेम विवाह केला होता. सध्या हा तरुण एका हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजतोय. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. सासूच्या या क्रूर कृत्यात जावई ७६ टक्के भाजला असल्याचं सांगण्यात येतंय. डॉक्टरांनी त्याला वैशालीतून पाटण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलेलं आहे.
गरोदरपणामुळं घरी आली होती मुलगी
पीडित जावयाचं नाव विकास कुमार असं आहे. विकास हा बसंतपूर गावातील रहिवासी आहे. गेल्या वर्षी ७ मे रोजी त्यानं करनेजी गावात राहणाऱ्या नेहा कुमारी हिच्याशी प्रेमविवाह केला होता. दोघांनीही घरच्यांपासून लांब राहण्यासाठी भाड्यानं खोली घेतली होती आणि तिथं संसार थाटला होता. काही दिवसांपूर्वी नेहा गरोदर राहिली. त्यानंतर तिनं माहेरी जाण्याच्या हट्ट नवऱ्यापासी केला. विकास यानंही मोठ्या मनानं तयारी दर्शवली आणि नेहाला तिच्या माहेरी नेऊन सोडलं.
मुलगी गोरी आणि जावई काळा म्हणून केलं हे क्रूर कृत्य
मुलीला माहेरी सोडतावेळीही सासूनं जावयावर आपला राग व्यक्त केला होता. आपली मुलगी गोरी आहे आणि जावई मात्र काळा आहे, याचा विशेष राग या महिलेच्या मनात होता. त्यामुळं तिला विकास आवडत नव्हता. लग्नाला एक वर्ष झाल्यानंतरही या महिलेनं विकासला जावई म्हणून स्वीकारलेलं नव्हतं. आपल्या मुलीचा विवाह दुसऱ्या कुठल्यातरी चांगल्या गोऱ्या मुलाशी लावून देऊ, अशी या महिलेची इच्छा होती.
विकासचा अडथळा दूर करण्यासाठी ही महिला संधीच्या शोधात होती. एक दिवस तिनं मुलगी नेहाला सांगून फोन करुन विकासला घरी बोलवून घेतलं. घरी आल्यावर तिनं विकासशी भांडण सुरु केलं. त्यानंतर या सासूनं रागाच्या भरात त्याच्या अंगावर पेट्रोल आणि रॉकेल ओतलं आणि थेट जिवंत जाळलं.