बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; दुसराही आरोपी सापडला
पुणे : बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले असून, उत्तरप्रदेशमधून या आरोपीला पकडण्यात आले आहे. गुन्हे शाखेने मध्यरात्रीपासून राबवलेल्या शोध मोहिमेनंतर त्याला पकडण्यात यश मिळाले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांनी एका आरोपीला पकडल्यानंतर उर्वरित फरार दोन आरोपींचा शोध सुरू होता. पोलीस त्यांचा शोध घेत असताना आरोपी त्याच्या मूळगावी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे असल्याचे समोर आले. यानूसार प्रयागराज येथे रविवारी मध्यरात्रीपासून शोध मोहिम राबवली गेली. सोमवारी दुपारी त्याला पकडण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपी मूळचा प्रयागराजचा असला तरी नागपूरमध्ये पत्नीसोबत राहत होता. तो पुण्यात भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने आलेला होता. मात्र, तिघेजन लुटमार करत होते. घटनेनंतर लागलीच तो नागपूर येथे पळून गेला. नागपूरवरून तो अलाहाबाद तसेच त्यानंतर प्रयागराजला गेला. त्याचे तीन लग्न झालेले असल्याची प्राथमिक माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय २०, रा. डिंडोरी, रा. मध्यप्रदेश) याला शुक्रवारी अटक केली होती. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा नोंद आहे. दहा दिवसांपुर्वी (दि. ३ ऑक्टोंबर) मध्यरात्री बोपदेव घाट येथे मित्रासोबत फिरायला गेलेल्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार करून त्यांना लुटले होते. शुक्रवारी हा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांना तब्बल सात दिवस आरोपींचे नावे निष्पन्न करण्यासह त्यांना पकडण्यात यश मिळाले नव्हते. पोलिसांची ७० पथकांसह ७०० पोलीस आरोपींचा शोध घेत होते. तर, माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षिसही जाहिर केले होते.
हजारो मोबाईल व दुचाकींची तपासणी, ५० गावांमधील साडे चारशे गुन्हेगार व शहरातील लुटमार करणाऱ्यांची चौकशी केली होती. तसेच, सीसीटीव्ही तपासणी केली जात होती. यादरम्यान, गुरूवारी आरोपी निष्पन्न करत पोलिसांनी शुक्रवारी यातील चंद्रकुमार कनोजिया याला पकडले होते. तर, दोघांचा शोध सुरू होता. त्यातील एका आरोपीला पकडले आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.