टपका रे टपका...; आयुषच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं? लहान भाऊ अर्णवने दिली धक्कादायक माहिती
पुणे : पुण्यातील टोळीयुद्धातून झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसंच गुन्हे शाखेने आंदेकर यांच्या घरावर छापा टाकून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला. यात सोने, रोकड, चांदी आणि जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांचा समावेश असून पोलिसांनी आंदेकरची मुलगी आणि इतर साथीदारांच्या घरावरही झडती घेतली असून आंदेकरच्या घरात मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. अशातच आता कोमकर खून प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयुषवर गोळ्या झाडल्यानंतर ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावले होते. याबाबत आयुषचा लहान भाऊ अर्णव कोमकरने माहिती दिली आहे.
आयुष लहान भावाला क्लासवरुन आणण्यासाठी गेला होता. तो परत आल्यानंतर बिल्डींगखाली पोहोचल्यानंतर आयुष गाडी पार्किंगमध्ये लावत होता. तेवढ्यात तेथे आंदेकर टोळीतील दोनजण आले आणि गोळ्या झाडू लागले. त्यांनी जवळपास आयुषवर 12 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 9 गोळ्या या आयुषच्या शरीरात शिरल्या होत्या. अर्णवने सांगितले की, पहिल्या दोन गोळ्या जेव्हा आयुषला लागल्या तेव्हाच तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर पोलिसांनी यायला जवळपास अर्धातास लावला. रुग्णवाहिका 40 ते 50 मिनिटांनी आली. तोपर्यंत बिल्डींगमध्ये असलेल्या डॉक्टरांना आयुषला तपासण्यासाठी बोलावले. ते रुग्णवाहिका बोलावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलीस केस असल्याचे सांगण्यात आले. तो पर्यंत आयुषचा मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह तेथेच पार्किंगमध्ये पडून होता.
आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष कोमकरवर जवळपास 12 गोळ्या झाडल्या. त्यापैकी अमन पठाणने जवळपास 8 गोळ्या झाडल्या होत्या. आयुषची हत्या करून तेथून निघाल्यानंतर ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावण्यात आले होते. अर्णवने याविषयी सांगताना म्हटले की, ‘ते गाणे इकडे लागले नव्हते, ते गाणे आंदेकर चौकात लावले होते. आयुषवर हल्ला झाला तेव्हा आई कल्याणी कोमकर आणि बहिण अक्षता कोमकर दोघीही घरात होत्या. गोळ्या झाडून तिथून निघताना दोन्ही मारेकऱ्यांनी म्हटले की, इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकर चालणार. बाकी कोण नाय. आमच्या नादाला लागणार त्यांचं असंच होणार.’
आंदेकर-गायकवाड टोळ्यांनी गुन्हेगारीतील ‘तो’ नियम मोडला
गुन्हेगारी विश्वात पाळला जाणारा एक अलिखीत नियम असतो. वैर-वैरातच ठेवायचे. कुटूंबिय, नातेवाईक, मित्र यांना स्पर्श करायचा नाही, अन् त्यांच्याकडे वाकड्या नजरेनेही पहायचे नाही. सरकारी कायद्याप्रमाणेच हा नियम प्रत्येक टोळी पाळते. मात्र, आंदेकर व गायकवाड टोळीच्या युद्धाने हा नियम मोडला आहे. गेल्या वर्षभरापासून दोन टोळ्यांच्या संघर्षाने कुटुंबियांना टार्गेट करण्याचा नवा ट्रेंड सुरू केला आहे. याच नियमभंगातून गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या दोन जणांचा बळी गेला. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ तर उडाली आहेच पण, हा नियमभंग आता आणखी किती जणांचा अशा पद्धतीने जीव घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.