बसमध्ये मी ओरडली पण...; स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पिडीतेचे सचिवांना पत्र
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणात पिडीत तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून अॅड. आसिम सरोदे यांनाच विशेष सरकारी वकिल म्हणून नेमावे, अशी मागणी केली आहे. त्यासोबतच पुणे पोलिसांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. धक्कादायक म्हणजे, त्या पहाटे आरोपी गाडेने दोनदा अत्याचार केल्यानंतर पुन्हा तिसऱ्यावेळी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार विरोधानंतर तो नराधम गाडे पळून गेला, असे तिने सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हंटले आहे.
पिडीत तरुणीने पत्रात ‘वैद्यकीय चाचणी, पोलिसांची भूमिका आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत तिने प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांकडून तिला उशीर झाल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप केला आहे. वैद्यकीय चाचणीवेळी देखील पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तपासणी केली. घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर चौकशीदरम्यान तिला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांसमोर अत्याचाराच्या घटनांचे तपशीलवार वारंवार वर्णन करावे लागले.
पीडितेने तिच्या पत्रात अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करताना म्हटले आहे की, आरोपी दत्ता गाडे याने दोनदा अत्याचार केल्यानंतर पुन्हा पार्श्वभागाकडून लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार प्रतिकार केल्याने तो पळाला, असेही या पत्रात म्हंटले आहे. सुरूवातिला तिला पोलीस अधिकाऱ्यांनी तीन वकिलांची नावे सुचवली जातील. त्यातून एक निवड असे सांगण्यात आले होते. पण, मला काही न सांगताच सरकारी वकिलांची नेमणूक केली. मी, असीम सरोदे यांना निवडण्याची मागणी केली तेव्हा एक दिवस उशीर झाला. आम्ही प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात आले. “माझा वकील निवडण्याचा अधिकार नाही का?” असा प्रश्नही तिने पत्रातून उपस्थित केला आहे.
मी, ओरडली… पण ते आठवले अन् घाबरले
तरुणीने पत्रात म्हटले की, घटनेच्या वेळी मी ओरडली, पण, माझा आवाज बसला आणि निघेनासा झाला. त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली. अनेकांना दिलेला त्रास आठवला. त्यामुळे जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे वाटले, म्हणून मी शांत राहिले असेही तिने म्हंटले आहे.
स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने दोन वेळा अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलिसांत आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला होता. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पुणे पोलिसांनी गुनाट या गावातील शेतात लपून बसलेल्या आरोपी गाडेला बेड्या ठोकल्या. त्यापुर्वी तरुणीच्या चारित्र्यावर संशय निर्माण केला गेला. खोटा नॅरेटिव्ह पसरवला गेला. त्या दोघांची ओळख होती, असेही सांगितले. तर गाडेच्या वकिलांनीच माध्यमांना तिने पैसे घेतल्याची खोटी माहिती दिली. या सर्वात मात्र, तरुणीला प्रचंड त्रासाला सामोरे जावा लागले होते.