पुण्यात गुंडाराज ! मार्केटयार्ड भागात पोलिसावरच हल्ला, लोखंडी कड्याने डोळ्यावर...
पुणे : पुणे शहरात पोलिसांना मारहाण झाल्याची तिसरी घटना समोर आली असून, मार्केटयार्ड परिसरात एका पोलिस हवालदारावर ट्रकचालक व त्याच्या साथीदारांनी लोखंडी कड्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. १७) रात्री मार्केटयार्ड परिसरात ही घटना घडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुमित सुभाष सरकटे (वय ३४, रा. खराडी, नगर रोड), अक्षय नानासाहेब शिंदे (वय ३०, रा. तळवडे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि मंजीत सुभाष कांबळे (वय २८, रा. घोरपडी गाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हवालदार महेश सुभाष साळुखे (वय ३९, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारदार साळुखे (दि. १७ ऑक्टोबर) हे बंडगार्डन पोलिस ठाण्यात कर्तव्यास आहेत. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते ड्युटी संपवून बिबवेवाडी येथील घरी जात होते. वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक दरम्यान एमएच-१२ एक्सएम ०८७४ या क्रमांकाचा ट्रक अत्यंत वेगात येऊन इतर वाहनांना धडकण्याचा धोका निर्माण करत होता. काही वाहनचालकांनी हा ट्रक मार्केटयार्ड गेट क्रमांक ९ येथे अडवला. त्या ठिकाणी चालकास जमावाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता, साळुखे यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. यानंतर चालकाने परवाना नसल्याचे सांगून ‘साईडवर माणसे आहेत’ असे सांगून काही वेळाने ४ ते ५ जणांसह पुन्हा तेथे आला. त्यावेळी साळुंखे यांनी त्याला गाडी चालवू नये असे सांगितल्यावर त्यांच्यात वाद झाला.
या दरम्यान अक्षय शिंदे या आरोपीने हातातील लोखंडी कड्याने साळुखे यांच्या डोळ्यावर आणि कपाळावर मारहाण केली, तर मंजीत कांबळे याने त्यांच्या हातांना धरून मारहाण केली. उपस्थित नागरिकांच्या मदतीने साळुखे यांची सुटका झाली. यानंतर त्यांनी ११२ वर संपर्क साधत पोलिसांची मदत मागितली. मार्केटयार्ड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून साळुंखे यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. उपचारानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मार्केटयार्ड पोलीस पुढील तपास करत आहेत.