कराडमध्ये धाडसी चोरी; महिला घरात असताना चोरट्यांनी दागिने चोरले
कराड : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून घरफोडीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कराड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मलकापूर (ता. कराड) येथील औदुंबर कॉलनीत दरवाजा उघडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी सुमारे साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. मलकापूरमधील आगाभाई चाळ येथे ही चोरीची घटना घडली आहे. याबाबत शाहीन साजिद आगा यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मलकापुरातील औदुंबर कॉलनीत शाहीन आगा या आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ९ एप्रिल रोजी रात्री घरातील सर्व कामे आटोपल्यानंतर साडेबाराच्या सुमारास शाहीन यांनी घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर रात्री पावणे दोनच्या सुमारास दरवाजा उघडल्याचा आवाज आल्यामुळे शाहीन यांना जाग आली. दोन चोरटे घरात घुसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. भीतीमुळे शाहीन यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना जवळ ओढून घेतले.
घरात घुसलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी तिजोरी उघडून त्यातील ड्रॉव्हरमध्ये असलेले २ लाख ७० हजार रुपये किमतीचे साडेचार तोळे वजनाचे गंठण, १ लाख १४ हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची अंगठी, ६० हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची चैन आणि साडेतीन हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर चोरटे तेथून निघून गेले. चोरटे घराबाहेर पडताच शाहीन यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र चोरटे त्यांच्या हाती लागले नाहीत. याबाबत शाहीन आगा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार विजय मुळे तपास करीत आहेत.